IND vs SA, ODI Series Team India : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) एकदिवसीय मालिकेसाठी भारताने आपला संघ जाहीर केला असून यावेळी बऱ्याच नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार असून आगामी विश्वचषकासाठी सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यासाठी युवा खेळाडूंना संघात घेतलं गेलं आहे. यावेळी रजत पाटीदार, मुकेश कुमार, राहुल त्रिपाठी आणि शाहबाज अहमद या चार आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंना भारताच्या एकदिवसीय संघात जागा मिळाली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघाचं नेतृत्त्व शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) तर उपकर्णधारपद श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्याकडे दिलं गेलं आहे. संघात आयपीएल 2022 गाजवणाऱ्या बऱ्याच युवा खेळाडूंना संधी दिली गेली असल्याने चार नव्या खेळाडूंना भारतीय संघाची दारं खुली झाली आहेत. यामधील रजत पाटीदारने आयपीएल प्लेऑफमध्ये शतक झळकावून चांगलं नाव कमावलं. त्यानंतर त्याने रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आणि न्यूझीलंड-ए विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही शतक झळकावलं. याच खेळीच्या जोरावर त्याला आता टीम इंडियामध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे. दुसरीकडे वेगवान गोलंदाज मुकेश कुमारनेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने छाप पाडली. नुकत्याच न्यूझीलंड-अ विरुद्ध खेळल्या गेलेल्या प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. याशिवाय राहुल त्रिपाठी आणि शाहबाज अहमद या दोन्ही खेळाडूंनी आयपीएलमध्ये कमाल कामगिरी केली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 6 ऑक्टोबर 2022 | लखनौ |
दुसरा एकदिवसीय सामना | 9 ऑक्टोबर 2022 | रांची |
तिसरा एकदिवसीय सामना | 11 ऑक्टोबर 2022 | दिल्ली |
हे देखील वाचा-