Rajat Patidar IND vs ENG : ध्रुव जुरेल, सरफराज खान यांनी एकीकडे पदार्पणात शानदार कामगिरी करत सर्वांची मनं जिंकली, पण त्याचवेळी पदार्पण करणाऱ्या रजत पाटीदारला छाप पाडण्यात अपयश आलं. पाटीदारला तीन सामन्यात संधी देऊनही प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे अखेरच्या सामन्यात पाटीदारला वगळण्यात आलेय. धर्मशाला कसोटी सामन्यात भारताने प्लेईंग 11 मध्ये दोन बदल केले. त्यामध्ये पाटीदारऐवजी देवदत्त पड्डीकल याला संधी देण्यात आली आहे. देवदत्त पड्डीकल यानं कसोटीमध्ये पादर्पण केले. रजत पाटीदार याला सहा कसोटीमध्ये एकही अर्धशतक ठोकता आले नव्हते. 


दरम्यान, रजत पाटीदार याला बुधवारी सरावादरम्यान डाव्या घोट्याला दुखापत झाली. त्यामुळे तो पाचव्या कसोटीसाठी उपलब्ध नसेल, अशी माहिती बीसीसीआयनं दिली आहे.  


रजत पाटीदार तिन्ही कसोटीत फ्लॉप -


विराट कोहलीने मालिकेतून माघार घेतल्यानंतर त्याच्या जागी रजत पाटीदारला संघात स्थान देण्यात आले. रजत पाटीदारला दुसऱ्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. मात्र रजत पाटीदारला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. रजत पाटीदारने 3 सामन्यांच्या 6 डावात 63 धावा केल्या आहेत. रजत पाटीदारला 6 डावात एकही अर्धशतक झळकावता आले नाही.  मालिकेतील त्याची सर्वोच्च धावसंख्या केवळ 32 धावा इतकी आहे. पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्या डावात त्यानं 32 धावांची खेळी केली होती. पण यानंतर रजत पाटीदारच्या बॅटमधून 5 डावात केवळ 31 धावा निघाल्या आहेत.


रजत पाटीदारचं क्रिकेट करिअर - 
रजत पाटीदार देशांतर्गत सामन्यांमध्ये मध्य प्रदेशकडून खेळतो. त्याने ऑक्टोबर 2015 मध्ये प्रथम श्रेणी पदार्पण सामना खेळला. यानंतर त्याने डिसेंबर 2015 मध्ये लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. रजतच्या एकूण कामगिरीवर नजर टाकली तर त्याने 58 लिस्ट ए सामन्यांमध्ये 1985 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 शतकं आणि 12 अर्धशतकं झळकावली आहेत. रजतची सर्वोत्तम कामगिरी 158 धावांची आहे. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांच्या 93 डावांमध्ये 4000 धावा केल्या आहेत. रजतने या फॉरमॅटमध्ये 12 शतकं आणि 22 अर्धशतकं केली आहेत. विशेष म्हणजे रजतचा अलीकडचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे.  रजत पाटीदार मध्य प्रदेशच्या अंडर-19 आणि अंडर-22 संघांसाठीही खेळला आहे. रजत आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो. आयपीएल 2022 मध्येही त्याने महत्त्वाची खेळी केल्याचं दिसून आलं होतं. देशांतर्गत टी 20 च्या 50 सामन्यात रजत पाटीदारने 1640 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 14 अर्धशतकाचा समावेश आहे. रजत पाटीदार याने वनडेमध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केलेय. आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात रजत पाटीदारने एका सामन्यात 22 धावा केल्या आहेत. या सर्वाचीच पोचपावती म्हणून रजतला संघात संधी मिळाली आहे.


सरफराज-ध्रुवचं यशस्वी पदार्पण -


इंग्लंडविरोधात कसोटी मालिकेत संधी मिळाल्यानंतरही रजत पाटीदार याला चमकदार कामगिरी करता आली नाही. अत्यंत खराब कामगिरीनंतर आता रजत पाटीदारसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाल्याचे दिसत आहे. याच मालिकेत सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांनाही पदार्पणाची संधी देण्यात आली होती. या दोन्ही खेळाडूंनी संघातील प्रभावी कामगिरी करत आपले स्थान पक्के केले आहे. राजकोट कसोटीच्या दोन्ही डावांत सरफराज खानने अर्धशतके झळकावली. रांचीमध्ये टीम इंडियासाठी ध्रुव जुरेल एक हिरो म्हणून उदयास आला.