Rajasthan T20 Match : टी20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक मोठ्या खेळ्या पाहायला मिळाल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबत देशांतर्गत क्रिकेटमध्येही अनेक फलंदाजांनी विस्फोटक फलंदाजी केली आहे. त्यामध्ये धावांचा डोंगर उभारलाय. कुणी वेगवान शतक केले, तर कुणी वेगवान अर्धशतक ठोकलं. पण राजस्थानच्या एका फलंदाजानं द्विशतक ठोकत मोठा विक्रम केला आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये स्थानिक स्पर्धेदरम्यान एका फलंदाजाने टी20 सामन्यात द्विशतकी खेळी केली. राजस्थानमध्ये या खेळीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. टी20 क्रिकेटमधील ही सर्वात मोठी वैयक्तीक खेळी म्हटलं जात आहे. सद्दाम शेख असं द्विशतकी खेळी कऱणाऱ्या फलंदाजाचं नाव आहे. सद्दाने टी20 क्रिकेटमध्ये 83 चेंडूमध्ये 240 धावांचा पाऊस पाडत ख्रिस गेलचा विक्रमही मोडीत काढला. 


टी20 सामन्याच्या एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेल याच्या नावावर आहे. ख्रिस गेल यानं आयपीएलमध्ये आरसीबीसाठी फलंदाजी करताना नाबाद 175 धावांचा पाऊस पाडला होता. पण ख्रिस गेल याचा हा विक्रम सद्दाम शेख यानं मोडीत काढला. सद्दामने अवघ्या 83 चेंडूमध्ये 240 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये त्यानं 28 चौकार आणि 13 षटकार ठोकले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये याआधीही एक द्विशतक पाहायला मिळालेय. वेस्ट इंडिजच्या रहकीम कॉर्नवाल याने टी20 मध्ये द्विशतक ठोकलेय. त्यानं 77 चेंडूत 205 धावांची खेळी केली होती. पण सद्दामने आता टी20 मधील सर्वोच्च खेळीची नोंद केली आहे. 


उदयपूर येथील एमबी ग्राऊंडवर मुस्लिम क्रिकेट लीग स्पर्धा सुरु आहे. यंदा या स्पर्धेचा तिसरा हंगाम सुरु आहे.  मस्तान क्लब आणि लेकसिटी यांच्यादरम्यानच्या सामन्यात मोठा विक्रम झालाय. लेकसिटीसाठी खेळणाऱ्या सद्दामने 240 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीमध्ये त्यानं 28 चौकार आणि 13 षटकार ठोकले. सद्दाम याच्या वादळी खेळीमुळे लेकसिटी यानं 20 षटकात 324 धावांचा डोंगर उभारला. मुस्लिम लीग स्पर्धेत 16 संघाचा समावेश आहे. तिसऱ्या हंगामाचा अंतिम सामना 5 मे रोजी पार पडणार आहे. 


देशांतर्गत क्रिकेट अथवा लोकल क्रिकेट सोडल्यास टी20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेल यानं 66 चेंडूमध्ये नाबाद 175 धावांची खेळी केली होती. यामध्ये 17 षटकार आणि 13 चौकारांचा समावेश होता. आरसीबीकडून खेळणऱ्या ख्रिस गेल यानं पुणे वॉरियर्सविरोधात 2013 मध्ये 175 धावांचा पाऊस पाडला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंच याच्या नावावर सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आहे. त्यानं 172 धावांची खेळी केली होती. त्याने 16 चौकार आणि 10 षटकार ठोकले होते.