सिडनी : ब्रिस्बेनच्या गाबामध्ये खेळवण्यात आलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर तीन विकेट्सनी ऐतिहासिक विजय मिळवला. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते क्रिकेट विश्वातील दिग्गजांनी टीम इंडियांचं अभिनंदन केलं. मात्र टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड या विजयानंतर सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. अनेक जण या विजयाचं श्रेय राहुल द्रविडला देत आहेत. कारण शेवटच्या कसोटीत खेळलेल्या अनेक खेळाडूंना क्रिकेटचे धडे द्रविडने गिरवले आहेत.


सोशल मीडियावर राहुल द्रविडला सलाम करण्यात येत आहे कारण ब्रिस्बेन कसोटी इलेव्हनमध्ये खेळलेल्या बहुतेक खेळाडू त्यांच्या यशाचं श्रेय द्रविडला देतात. खरंतर राहुल द्रविड भारत अ संघाचा प्रशिक्षक होता. त्यावेळी राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, मनीष पांडे, ऋषभ पंत आणि हनुमा विहारी यांनी बरंच क्रिकेट खेळलं आहे. या खेळाडूंनी मुलाखतीत अनेकदा असं म्हटलं आहे की राहुल द्रविडचा त्यांच्या खेळाचा दर्जा वाढवण्यात मोठा हात आहे.





ऑस्ट्रेलिया विरुद्ध ब्रिस्बेन कसोटीत टीम इंडियाची गोलंदाजी कमी अनुभवी होती. दोन कसोटी सामने खेळणारा मोहम्मद सिराज गोलंदाजीचं नेतृत्व करत होता. शार्दुल ठाकूर फक्त 1 कसोटी सामना खेळला होता. वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन यांचा हा पहिला सामना होता. या सर्व खेळाडूंनी राहुल द्रविडकडून बरंच काही शिकलं आहे. या खेळाडूंबरोबर द्रविडने घेतलेली मेहनत ब्रिस्बेनच्या मैदानावर दिसली. दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह, आर अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव यांच्या अनुपस्थितीत भारताने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत केले. सध्या राहुल द्रविड नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीचा चेअरमन आहे.









संबंधित बातम्या