मुंबई : इंग्लंड विरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी प्रथमच अष्टपैलू अक्षर पटेलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी कसोटी सामना खेळणारा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरलाही इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. सुंदरने पदार्पणाच्या कसोटीत गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींमध्ये चमकदार कामगिरी केली. याचं बक्षिस म्हणून त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली. सुंदरने पहिल्या कसोटीत चार विकेट आणि 84 धावा केल्या. याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा मोहम्मद सिराजलाही इंग्लंडविरूद्ध संधी देण्यात आली आहे. सिराजने कांगारूंच्या विरोधात केवळ तीन कसोटी सामन्यात 13 विकेट घेतल्या.


ईशांत शर्माचं पुनरागमन


इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा भारतीय संघात परतला आहे. दुखापतीमुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौर्‍याला मुकावं लागलं होतं. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना वेगवान गोलंदाज म्हणून स्थान मिळालं आहे. त्याचबरोबर आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना फिरकीपटू म्हणून स्थान देण्यात आलं आहे.


हार्दिक पांड्याला 29 महिन्यांनंतर कसोटी संघात स्थान


इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी अष्टपैलू हार्दिक पांड्याही संघात परतला आहे. त्याने शेवटची कसोटी इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट 2018 मध्ये खेळली होती. भारतीय खेळपट्ट्यांवर हार्दिक खूप प्रभावी ठरू शकतो. कसोटी क्रिकेटच्या 11 सामन्यात शतकी खेळीसह त्याने 532 धावा आणि 17 गडी बाद केले आहेत.


पृथ्वी शॉ आणि टी नटराजन संघाबाहेर


ऑस्ट्रेलियामध्ये खराब कामगिरी करणाऱ्या सलामीवीर पृथ्वी शॉची इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात निवड झालेली नाही. याशिवाय गाबा कसोटीत पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज टी नटराजन याचीही या संघात निवड झालेली नाही. नटराजनने पहिल्या कसोटीत तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, अष्टपैलू रवींद्र जाडेजा आणि मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारी हेदेखील दुखापतीमुळे या संघाचा भाग नाहीत. तथापि, उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी या खेळाडूंचा संघात समावेश केला जाऊ शकतो.


भारतीय संघ


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.


संबंधित बातम्या