Rachin Ravindra Suffers Head Injury : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आयोजनासाठी नवीन सुविधांसह बांधण्यात आलेल्या लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर जगभरात टीका होत आहे. खरं तर, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी शनिवारी न्यूझीलंडचा युवा क्रिकेटपटू रचिन रवींद्र येथे एक झेल घेताना गंभीर जखमी झाला. शनिवारी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात तिरंगी एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मैदानातील सदोष लायटिंगमुळं रचिन रवींद्र नजर हटली आणि चेंडू त्याच्या डोळ्याजवळ त्याच्या चेहऱ्यावर लागला. चेंडू लागताच तो रक्तबंबाळ झाला.  




गद्दाफी स्टेडियमची पोल खोल


या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या अपघातासाठी गद्दाफी स्टेडियमच्या खराब प्रकाशयोजनेला लोकांनी जबाबदार धरले आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमच्या फ्लडलाइट्समध्ये चेंडू दिसत नाही असे म्हटले जात आहे. झेल घेताना रचिन रवींद्रचा झेल चुकला आणि चेंडू त्याच्या डोळ्याजवळ त्याच्या चेहऱ्यावर लागला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी अशा घटनेने पाकिस्तानची चिंता वाढवली आहे.




न्यूझीलंड क्रिकेटच्या निवेदनानुसार, रचिन रवींद्रला कपाळावर दुखापत झाल्यामुळे मैदानावर तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली आहे, एचआयए प्रोटोकॉलनुसार त्याच्यावर देखरेख ठेवली जाईल. या घटनेनंतर सोशल मीडियावरील चाहत्यांनी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर जोरदार टीका केली आहे. येथील फ्लडलाइट्स सुधारण्याची मागणी केली आहे. एका चाहत्याने सोशल मीडियावर म्हटले की, पीसीबीने मैदानावरील फ्लडलाइट्सची गुणवत्ता सुधारली पाहिजे. 




पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवणार


आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान खेळवली जाईल. एकदिवसीय क्रिकेटच्या या मेगा स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानकडे आहे. 50 षटकांच्या वर्ल्ड कपनंतर, पुढचा सर्वोच्च ट्रॉफी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. एका अर्थाने याला मिनी वर्ल्ड कप असेही म्हणतात. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही आणि त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये होतील. तर इतर संघांसाठी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाईल. पाकिस्तान संघ त्यांचे सर्व सामने भारत वगळता इतर संघांविरुद्ध लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथे खेळेल.


स्टेडियमच्या सुविधांवरील प्रश्न


पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अलीकडेच घोषणा केली की, लाहोरमधील गद्दाफी स्टेडियम आता पूर्णपणे तयार आहे आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचे आयोजन करण्यास उत्सुक आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमचे काम 117 दिवसांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले. हे स्टेडियम पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक आणि सुविधांनी सुसज्ज बनवण्यात आले आहे. लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये आता चांगल्या सुविधा, नवीन फ्लडलाइट्स, हॉस्पिटॅलिटी बॉक्स, अधिक बसण्याची क्षमता, इलेक्ट्रॉनिक स्कोअरबोर्ड आणि उच्च-स्तरीय एलईडी टॉवर्स आहेत. गद्दाफी स्टेडियममध्ये 34 हजार प्रेक्षक बसून सामना पाहू शकतात. मात्र, रचिन रवींद्रसोबत घडलेल्या घटनेमुळे या स्टेडियमच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.