R Ashwin Retirement : भारतीय संघाचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवण्यात आलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर अश्विनने आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला. निवृत्तीची घोषणा करताना तो म्हणाला की, त्याच्यात अजूनही पंच बाकी आहे आणि तो क्लब क्रिकेट खेळत राहील.
अश्विनने भारताचा कसोटीतील दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून कारकीर्द संपवली. अश्विनने 106 कसोटी सामन्यांमध्ये 537 विकेट घेतल्या आणि माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 619 विकेट घेतल्या. सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने फक्त एकच सामना खेळला. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी अश्विनला प्लेइंग-11 मध्ये संधी देण्यात आली नाही, तर ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटीसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले होते, जो त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. तिसऱ्या कसोटीत अश्विनच्या जागी रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली.
अश्विन खेळणार क्लब क्रिकेट
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित झाल्यानंतर अश्विन कर्णधार रोहित शर्मासोबत पत्रकार परिषदेला पोहोचला. यावेळी तो म्हणाला, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. भारतीय संघाचा क्रिकेटपटू म्हणून आज माझा शेवटचा दिवस होता. मला वाटते की क्रिकेटर म्हणून माझ्यात अजूनही पंच शिल्लक आहेत, पण मी क्लब क्रिकेटमध्ये हे दाखवून देईन. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस होता.
रोहितने केले अश्विनच्या निर्णयाचे समर्थन
रोहित म्हणाला की, हा पूर्णपणे अश्विनचा निर्णय होता आणि आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो. पर्थला पोहोचल्यानंतर मी अश्विनच्या निवृत्तीबद्दल ऐकले होते. संघ काय विचार करतो हे त्याला माहीत आहे. मी त्याला पिंक बॉलच्या कसोटीपर्यंत संघात राहण्यास सांगितले होते.
गौतम गंभीर काय म्हणाला?
तर टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून गंभीरने की, 'एक युवा गोलंदाज ते दिग्गज होण्यापर्यंतचा प्रवास पाहण्याची मला संधी मिळाल्याचा आनंद आहे. तू असा क्रिकेटपटू आहे, ज्याला कधीही ट्रेड करू शकत नाही. मला माहित आहे अशी एक पिढी येईल, जी म्हणेल की आम्ही अश्विनला पाहून गोलंदाज झालो. तुझी कमी नक्की आम्हीला जाणवेल.'
अश्विनने कोहलीसोबत केली चर्चा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबा कसोटीच्या पाचव्या दिवशी पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता, तेव्हा अश्विन आणि कोहली ड्रेसिंग रूममध्ये बराच वेळ चर्चा करताना दिसले. कोहली बराच वेळ अश्विनशी बोलत राहिला आणि यादरम्यान त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आणि कोहलीने अचानक अश्विनला मिठी मारली. हे फोटो समोर आल्यानंतर अश्विन काही मोठा निर्णय घेऊ शकतो असे संकेत मिळाले होते. यानंतर काही वेळातच या ऑफस्पिनरने आपल्या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले.
हे ही वाचा -