Preity Zinta CPL 2024: सेंट लुसिया किंग्सने प्रथमच सीपीएल (CPL 2024) चे विजेतेपद पटकावले आहे. सेंट लुसिया किंग्सने सीपीएलमध्ये तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला होता. फाफ ड्यु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली सेंट लुसिया किंग्सने यंदा अंतिम फेरीत बाजी मारली. 


अंतिम सामन्यात सेंट लुसिया किंग्सने गतविजेत्या गयाना ॲमेझॉन वॉरियर्सचा 6 गडी राखून पराभव केला. सेंट लुसिया किंग्जच्या विजयात अमेरिकन फलंदाज आरोन जोन्स आणि अफगाणिस्तानचा गोलंदाज नूर अहमद यांचा मोठा वाटा होता. 






प्रीती झिंटा सेंट लुसियाची मालकीण-


बॉलिवू़ड अभिनेत्री प्रीती झिंटा आयपीएलमधील पंजाब किंग्सची सहमालक आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत एकदाही पंजाब किंग्सने जेतेपद पटकावलेलं नाही. एकुण 17 हंगाम खेळूनही प्रीती झिंटाचा पंजाब किंग्स संघ आयपीएलमध्ये एकदाच अंतिम फेरीपर्यंत पोहचला आहे. मात्र सीपीएलमध्ये सेंट लुसियाने अंतिम फेरी जिंकल्याने प्रीती झिंटासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण प्रीती झिंटा सेंट लुसिया संघाची मालकीण आहे. 






सामना कसा राहिला?


अंतिम सामन्यात गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 138 धावा केल्या. सेंट लुसिया किंग्सने उत्कृष्ट गोलंदाजी करुन गयाना संघाला 139 धावांवरच रोखले. सेंट लुसियाकडून नूर अहमद हा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. नूर अहमदने 4 षटकांत 19 धावा देत 3 बळी घेतले. सेंट लुसियाच्या गोलंदाजांसमोर गयानाच्या फलंदाजांची अवस्था इतकी वाईट होती की, 25 धावा करणारा फलंदाज संघाचा सर्वाधिक धावा करणारा ठरला. सेंट लुसिया किंग्सला विजयासाठी 139 धावांचे लक्ष्य मिळाले. या धावांचा पाठलाग करताना सेंट लुसियाची सुरुवात चांगली झाली नाही. सेंट लुसियाने 51 धावांत 4 विकेट्स गमावल्या. यानंतर ॲरॉन जोन्स आणि रोस्टन चेस यांनी 50 चेंडूत केलेल्या नाबाद 88 धावांच्या भागीदारीने संघाला विजय मिळवून दिला. ॲरॉन जोन्सने 31 चेंडूत 48 धावा केल्यानंतर अंतिम फेरीत नाबाद राहिला तर रोस्टन चेसने 22 चेंडूत 39 धावा केल्यानंतर नाबाद राहिला.


गयाना संघाचा सहाव्यांदा अंतिम फेरीत पराभव- 


गयाना ॲमेझॉन वॉरियर्सने कॅरिबियन प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत सर्वाधिक म्हणजे 7 वेळा प्रवेश केला आहे. यानंतरही संघ फक्त एकदाच विजेता होऊ शकला. गयाना संघाला सहाव्यांदा विजेतेपदाच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 2013, 2014, 2016, 2018 आणि 2019 मध्ये देखील गयाना संघाचा पराभव झाला होता. गयाने संघाने 2023 मध्ये जेतेपद पटकावले होते. 


संबंधित बातमी:


Ind vs Ban: भारत-बांगलादेश सामन्यात बीसीसीआयने केली मोठी चूक; एका खेळाडूच्या नावावरून प्रचंड गदारोळ