नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. धोनीच्या निवृत्तीनंतर अनेक दिग्गजांनी त्याला पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच आता पंतप्रधान मोदींनी धोनीला एक भावुक पत्र लिहिलं असून क्रिकेटमधील त्याच्या योगदानाचं कौतुक केलं आहे. तसेच मोदींनी पत्रात धोनीने देशातील जनतेवरही ठसा उमटवल्याचं अधोरेखीत केलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनी या पत्रात धोनीच्या व्यक्तीमत्त्वाचे पैलू, त्याचं त्याची मुलगी जीवासोबत असलेल्या नात्याबाबतही लिहिलं आहे. त्याचबरोबर मोदींनीही आशा व्यक्त केली आहे की, आता धोनी आपल्या कुटुंबाला अधिक वेळ देऊ शकले. पंतप्रधानांनी सशस्त्र दलांवर असलेल्या धोनीच्या प्रेमाबाबतही पत्रात नमूद केलं आहे.
दरम्यान, पंतप्रधानांनी जरी हे पत्र धोनीला लिहिलं असेल तरी देशातील प्रत्येकासाठी आणि विशेषतः तरुणांसाठी त्या यापत्रातून एक संदेश दिला. जसं की, आपल्या कौटुंबिक आणि व्यावहारिक आयुष्यात संतुलन कसं राखावं याबाबत यामध्ये मोदींनी लिहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पत्रात लिहिलं आहे की, 'धोनीकडून कौटुंबिक आणि व्यावहारिक आयुष्यात संतुलन राखण्याची पद्धत शिकणं गरजेचं आहे.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोनीच्या जीवनातील प्रेरणादायी क्षणांचा पत्रात उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, 'धोनीकडून आपल्यापैकी प्रत्येकाला शिकवण मिळते की, कधीही आशा गमावू नका आणि शांत रहा.
दरम्यान, धोनीनं एक क्रिकेटर आणि एक कर्णधार या नात्यानं भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं आहे. 2007 सालचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक, 2011 सालचा वन डे विश्वचषक, 2012 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी, याच कालावधीत कसोटी क्रमवारीतला नंबर वन ही सारी कामगिरी म्हणजे कर्णधार म्हणून धोनीच्या यशाचा परमोच्च बिंदू होता. त्याच वेळी एक फलंदाज आणि तेही अखेरच्या षटकांत विजयी घाव घालणारा फलंदाज म्हणून धोनीचं कर्तृत्व खूप मोठं होतं. त्यानं 15 वर्षांच्या कारकीर्दीत 350 वन डे सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या खात्यात 10 शतकं आणि 73 अर्धशतकांसह 10 हजार 773 धावा जमा आहेत. धोनीनं 98 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये 37.60 च्या सरासरीनं 1617 फटकावल्या आहेत. ट्वेन्टी ट्वेन्टीत त्याचा स्ट्राईक रेट तर तब्बल 126.13 आहे. ही सारी कामगिरी लक्षात घेऊनच धोनीला कॅप्टन कूल आणि मॅचफिनिशर या उपाधी त्याला मानानं बहाल करण्यात आल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या :
मै पल दो पल का शायर हूँ... निवृत्ती जाहीर करताना महेंद्र सिंह धोनी भावूक
कॅप्टन कूल धोनीच्या निवृत्तीवर सचिन, विराटची प्रतिक्रिया, म्हणाले...
'या' तीन क्षणांनी महेंद्र सिंह धोनीला भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात अढळ स्थान मिळवून दिलं