मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विकेटकिपर महेंद्रसिंग धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर 15 ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यशस्वी कर्णधार अशी धोनीची ओळख होती. धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सोशल मिडीयावर शुभेच्छांचा पाऊस पडला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कर्णधार विराट कोहलीने धोनीला ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिन आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला, "2011 साली वानखेडे स्टेडिअमवर तुझ्यासोबत विश्वचषक जिंकणं हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता. तुला तुझ्या दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा"
धोनीच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीनं भावनिक ट्वीट केलं आहे. विराट म्हणाला,''एक दिवस प्रत्येकाचा प्रवास संपतो, परंतु तुमच्या जवळच्या व्यक्तीनं निवृत्तीचा निर्णय घेतल्यावर मन भरून येतं. लोकांनी तुझं यश पाहिलं आहे पण मी तुझ्यातला माणूस पाहिला आहे. तू या देशासाठी जे केलं आहेत, ते प्रत्येकाच्या हृदयात कायम राहिल''
महेंद्र सिंह धोनी पाठोपाठ आता फलंदाज सुरेश रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घोषित केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत सुरेश रैनाने क्रिकेट मधून संन्यास घेतल्याचं जाहीर केलं आहे.
संबंधित बातम्या :
MS Dhoni Retires: मै पल दो पल का शायर हूँ... निवृत्ती जाहीर करताना महेंद्र सिंह धोनी भावूक
Suresh Raina Retires | महेंद्र सिंह धोनी पाठोपाठ सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती