Shane Watson, PCB : सध्याच्या घडीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची अवस्था अतिशय वाईट आहे. नवे मैदान तर सोडा, आहे त्या मैदानाच्या दुरुस्तीसाठी पैसा नाही. इतकेच नाही तर पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना पगारही वेळेवर मिळत नाही. असे असतानाही पीसीबी शेन वॉटसनला 17 कोटी रुपयांचं मानधन देण्यास तयार आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसन याल पाकिस्तान क्रिकेट संघाचा नवा प्रशिक्षक करण्यसाठी बोलणी सुरु आहेत. त्यासाठी 17 कोटी रुपये पाकिस्तान मोजणार आहे. 


शेन वॉटसन याच्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. तरीही पीसीबी आणि शेन वॉटसन यांच्यातील करार निश्चित झाल्याचे मानले जात आहे. कोचिंगसाठी पीसीबी शेन वॉटसनला 17 कोटी रुपये देणार आहे.


शेन वॉटसन पाकिस्तान क्रिकेट संघासोबत कधी जोडला जाणार ?


टी 20 विश्वचषकापूर्वी एप्रिल महिन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात मालिका होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेन वॉटसन या मालिकेपासून पाकिस्तान क्रिकेट संघासोबत प्रशिक्षक म्हणून काम सुरु करणार आहे. पण शेन वॉटसनला दिले जाणारे 17 कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कुठून आणणार असा प्रश्न पाकिस्तनमधील चाहते उपस्थित करत आहेत. यावरुन नेटकऱ्यांनी पीसीबीची खिल्लीही उडवली आहे.  


PCB च्या अडचणी वाढल्या - 


पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अधीच अडचणीत आहे, त्यात इतकी मोठी रक्कम देणं सोपं नसेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खेळाडूंना पगारही व्यवस्थित देत नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. खेळाडूंना इतर मानधन दिलं जात नाही. पाकिस्तानमधील मैदानाची स्थिती अतिशय बिकट आहे. आशा परिस्थितीमध्ये विदेशी कोच ला तब्बल 17 कोटींचं मानधन देणं, कितपत योग्य आहे. त्यामुळे शेन वॉटसनची फी पीसीबीच्या अडचणी वाढवण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. 2023  मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांना बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर आता नव्या प्रशिकाच्या शोधात पीसीबी आहे. त्यासाठीशेन वॉटसनशिवाय डॅरेन सॅमी, सायमन कॅटिच, माइक हेसन आणि फिल सिमन्स यांच्यामध्ये स्पर्धा आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर शेन वॉटसन याचं नाव आहे. त्याचं नाव जवळपास निश्चित मानलं जातेय.