What Is ICC Stop Clock Rule : अतिरिक्त वेळ घालवणाऱ्या संघाविरोधात आयसीसीनं आता कठोर पावलं उचलली आहेत. क्रिकेट सामन्यात एखाद्या संघाला ठरलेल्या वेळेमध्ये षटकं पूर्ण करता येत नाहीत, त्यामुळे सामना नियोजित वेळेपेक्षा खूप उशिरा संपतो. पण आता वेळ वाया घालवणाऱ्या संघांना धक्का देण्यासाठी आयसीसीनं कठोर पावलं उचलली आहेत. T20 आणि ODI फॉरमॅटमध्ये वेळ वाया घालवला आणि निर्धारित वेळेत षटके पूर्ण केली नाहीत, तर प्रतिस्पर्धी संघाला 5 पेनल्टी धावा मिळतील. म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावसंख्येमध्ये 5 धावांची भर पडेल. आयसीसी हा मोठा निर्णय घेणार आहे. 


Stop Clock Rule हा नियम कसं काम करेल ? आयसीसीचा नियम काय ?


वेळ घालवणाऱ्या संघाला पाच धावांची पेनल्टी, हा नियम डिसेंबर 2023 मध्ये प्रयोगिक तत्वावर प्रथमच वापरण्यात आला. ज्या अंतर्गत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पुढील षटकाचा पहिला चेंडू षटक संपल्यानंतर 60 सेकंदात टाकायचा आहे. यासाठी मैदानावर डिजिटल डिस्प्ले बसवण्यात येणार आहेत, जेणेकरून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधार आणि खेळाडू वेळेचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करू शकतील. टी-20 आणि वन डे फॉर्मेटचे सामने वेळेवर संपले पाहिजेत, यासाठी आयसीसीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी हा नियम आवश्यक आहे. या नियमाला स्टॉप क्लॉक नियम असे नाव देण्यात आले आहे.



फील्डिंग करणाऱ्या संघाला आधी वॉर्निंग, नंतर.... 


फील्डिंग करणाऱ्या संघाला षटक संपल्यानंतर 60 सेकंदापर्यंत नवीन षटकाचा पहिला चेंडू टाकता आला नाही, तर फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावा मिळतील. मात्र, या नियमानुसार, फलंदाजी करणाऱ्या संघाला पेनल्टी धावा देण्यापूर्वी फिल्डिंग करणाऱ्या संघाला दोनदा ताकीद दिली जाईल. मात्र त्यानंतरही असे झाल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाच्या स्कोअरमध्ये 5 पेनल्टी धावा जोडल्या जातील. हा नियम अद्याप अधिकृतपणे लागू झाला नसला तरी आयसीसी समिती या मुद्द्यावर निर्णय घेईल. परंतु  या वर्षी एप्रिलपासून आंतरराष्ट्रीय टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये स्टॉप क्लॉक नियम लागू केला जाईल. विश्वचषकातही हा नियम लागू केला जाऊ शकतो. आयसीसीच्या वार्षिक बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. आयसीसीने याबाबत ट्वीटही केलेय.


भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस - 


आयसीसीच्या आज झालेल्या वार्षिक बैठकीत विश्वचषकातील राखीव दिवसाच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. टी 20 विश्वचषकात ग्रुप स्टेज आणि सुपर-8 सामन्यांचा निकाल जाहीर होण्यासाठी दोन्ही संघांना प्रत्येकी किमान 5 षटकांचा सामना खेळावा लागेल. तर बाद फेरीतील निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांना प्रत्येकी किमान 10 षटकं खेळावी लागतील. त्या आधारेच विजेत्याची निवड केली जाणार आहे.