PCB Wants All Matches Asia Cup 2023 Shift To Pakistan : यंदाचा आशिया चषक हायब्रिड मॉडेलनुसार होत आहे. पाकिस्तानमध्ये चार तर श्रीलंकामध्ये नऊ सामने होणार आहेत. पण श्रीलंकामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे सामन्यावर परिणाम होत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. त्याशिवाय आजच्या भारत आणि नेपाळ यांच्यातील सामन्यावरही पावसाचे सावट आहे. तसचे कोलंबो येथेही सध्या मुसळधार पाऊश कोसळत असल्यामुळे  सुपर-4 मधील काही सामने रद्द होण्याची शक्यता आहे.  सुपर 4 चे सामने दाम्बुला येथे शिफ्ट करण्याचे वृत्त समोर येत आहे. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीने आशियाई क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष जय शाह यांच्याकडे स्पर्धेचे उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये शिफ्ट करण्याची सूचना केली आहे. 


पाकिस्तानचे वृत्तपत्रत डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, पीसीबी मॅनेजमेंट समितीचे अध्यक्ष जका अशरफ यांनी एसीसी अध्यक्ष जय शाह यांच्याकडे सामने शिफ्ट करण्याची सूचना केली आहे. ते म्हणाले की, श्रीलंकेतील खराब हवामानामुळे आशिया कप 2023 चे उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये शिफ्ट करायला हवेत.  कोलंबोमध्ये 9 सप्टेंबर रोजी सुपर 4 सामना होणार आहे, त्याशिवाय फायनलही येथेच होणार आहे. सध्याच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोलंबोमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  



कँडी येथे दोन सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना खेळला गेला. पण हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. भारताने प्रथम फलंदाजी करत 266 धावांपर्यंत मजल मारली होती. पण दुसऱ्या डावात पावासने हजेरी लावली. त्यामुळे सामना रद्द करावा लागला. पावासामुळे अनेक चाहत्यांच्या रंगाचा बेरंग झाला.  त्याचबरोबर येत्या काही दिवसांत कोलंबोमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तर पावसामुळे येथे आधीच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.


भारत-नेपाळ सामन्यावर पावसाचे सावट - 


भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये कँडी येथे सामन्याला सुरुवात झाली आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या सामन्यावरही पावसाचे संकट असल्याचे समोर आले आहे. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर कँडीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे भारत आणि नेपाळ सामना प्रभावित होण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, कोलंबो येथे होणारे आशिया चषकाचे सामने दाम्बुला येथे शिफ्ट करण्याबाबत आशियाई क्रिकेट काऊन्सिल विचार करत आहे.