Asia Cup 2023 : आशिया चषकात आज टीम इंडिया (Team India) आपला दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. स्पर्धेतील भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत झाला आहे. आता भारताची दुसरी लढत ग्रुपमधील तिसरा संघ नेपाळसोबत (Nepal) आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे नेपाळविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघासमोर 'करो या मरो'ची स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने (Pakistan) आधीच पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. जर आजच्या सामन्यात भारताने नेपाळला पराभूत केलं तर पुढील फेरीच जाण्याचा मार्ग मोकळा होईल.
आशिया चषकात एकूण सहा संघ सहभागी झाले आहेत आणि ते दोन ग्रुपमध्ये विभागले आहेत. पुढील फेरीत दोन्ही ग्रुपमधून प्रत्येकी दोन संघांनाच जागा मिळणार आहे. भारताकडे सध्या एक गुण आहे. तर पाकिस्तान तीन गुणांसह पुढील फेरीत दाखल झाला आहे. तर भारताविरुद्धचा आजचा सामना नेपाळने जिंकला तर संघाच्या खात्यात दोन गुण जमा होतील आणि पुढील फेरीत प्रवेश मिळवेल. अशा परिस्थितीत भारतीय संघ आशिया चषकातून बाहेर पडेल. मात्र नेपाळसारख्या कमकुवत संघाला भारतीय संघ सहजरित्या पराभूत करेल, अशी अपेक्षा आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा लढत?
नेपाळला पराभूत केल्यास भारतीय संघाकडेही 3 गुण जमा होतील आणि पुढील फेरीत दाखल होईल. या ग्रुपमध्ये भारताचं स्थान पहिलं असेल की दुसरं हे नेपाळविरुद्ध मिळणाऱ्या विजयाच्या अंतरावरुन निश्चित होणार आहे. मागील सामना रद्द झाल्यामुळे भारत आणि पाकिस्ताला प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यापैकी कोणता संघ पहिल्या स्थानावर राहणार हे नेट रन रेटद्वारेच निश्चित होणार आहे. जर भारताने या सामन्यात नेपाळला पराभूत केलं तर चाहत्यांना टीम इंडिया आणि पाकिस्तानमधील लढत पाहायला मिळेल.
भारताला झटका, बुमराह स्पर्धेतून माघारी
दरम्यान, या सामन्याच्या आधी भारताला मोठ झटका बसला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा नेपाळविरुद्धच्या सामान्यात खेळू शकणार नाही. तो स्पर्धेच्या मध्यातूनच मायदेशात परतला आहे. जसप्रीस बुमराह बाबा बनला आहे. त्याची पत्नी संजना गणेशनने मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळेच बुमराह भारतात परत आला असल्याचं समजतं. तत्पूर्वी बुमराहच्या जागी मोहम्मद शमीला प्लेईंग 11 मध्ये जागा मिळाली आहे.
हेही वाचा
IND vs NEP Weather Report : पाकिस्ताननंतर भारत-नेपाळ सामन्यावरही पावसाचे संकट, पाहा हवामानाचा अंदाज