Maharashtra Women's Football Team: पालघर जिल्ह्यातील (Palghar) निहे गावच्या तन्वी अरुण पाटील (Tanvi Patil) हिची अहमदाबाद येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला फुटबॉल संघात वर्णी लागल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.गुजरातमधील अहमदाबाद येथे 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय स्पर्धा 2022 आयोजित करण्यात आल्या आहेत.या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला फुटबॉल संघाकडून तन्वी पाटील प्रतिनिधीत्व करणार आहे.


पालघर जिल्ह्यातील पहिलीच महिला फुटबॉलपटू 
महाराष्ट्र महिला फुटबॉल संघात निवड झालेली तन्वी पाटील ही पालघर जिल्ह्यातील पहिलीच महिला फुटबॉलपटू आहे. पालघरच्या पूर्व भागात निहे या खेडेगावात जन्म झालेल्या तन्वीचे वडील अरुण पाटील हे कुटुंबासह सरावली येथे राहत असून तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत कामाला आहेत. तर, आई गृहीणी आहे. तन्वी आणि तिची लहान बहीण अदीक्षा दोन्ही बहिणींनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.


तन्वीची जीवापाड मेहनत
तन्वी हिने पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालय येथे शिक्षण घेतले असून कॉलेजमध्ये असताना एन.सी.सी.मध्ये सहभाग घेऊन 2018 साली दिल्ली मध्ये झालेल्या थलसेना शिबिरामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले होते.सुरूवातीला बोईसर येथील पीडीटीएस मैदानावर फुटबॉलच्या सरावाला सुरूवात केली. त्यानंतर अधिक चांगल्या प्रशिक्षणासाठी तन्वीने मुंबई येथे धाव घेतली.त्यासाठी सकाळी 4 वाजता उठून रोजचा जाऊन-येऊन 7 ते 8 तासांचा लोकलचा प्रवास आणि खडतर प्रशिक्षण यामध्ये घरी पोचायला रात्रीचे 11 वाजायचे.


पालकांसह प्रशिक्षकांचा भक्कम पाठींबा
आपले फुटबॉलमधील ध्येय गाठण्यासाठी तन्वीने अपार मेहनत घेतली असून रात्री फक्त 3-4 तासांची झोप मिळत असे. तन्वीला देशाच्या विविध शहरात शिबिरे आणि स्पर्धेसाठी प्रवास करावा लागत असे.या दरम्यान तीला आई-वडील,बहीण आणि प्रशिक्षकांचा भक्कम पाठींबा मिळाला.


महाराष्ट्र फुटबॉल संघात निवड झाल्यानं तन्वीचा सत्कार
तन्वीच्या या यशाबद्दल सूर्यवंशी क्षत्रीय युवक मंडळ,पालघर तालुका पूर्व विभाग व निहे ग्रामस्थ यांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आलाय.या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सोगले,विश्वस्त भालचंद्र पाटील,सुनील शेलार,चंद्रशेखर नाईक,उपाध्यक्ष विपुल पाटील,चिटणीस कल्पेश पवार,खजिनदार हेमंत पावडे,माजी उपाध्यक्ष वैभव पाटील,गणेश पाटील आणि निहे गावातील नागरिक उपस्थित होते.


महाराष्ट्र महिला फुटबॉल संघात निवड झाल्यानंतर तन्वी पाटीलची प्रतिक्रिया
"सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातून एनसीसी मध्ये असताना फुटबॉल चे धडे घेतल्यानंतर, मला फुटबॉल मध्ये पालघर जिल्हा फुटबॉल असोसिएशनने चांगली मदत केली. त्यामुळं या असोसिएशन चा मला अभिमान वाटतो.या मुळेच मी ही उत्तुंग भरारी घेतली आहे .अजूनही ही असोसिएशन मला सर्वतोपरी मदत करत आहे."


हे देखील वाचा-