Pakistan Asif Ali Retires From International Cricket : आशिया कप 2025 च्या तोंडावर पाकिस्तान क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा स्टार फलंदाज आसिफ अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आसिफने पाकिस्तानकडून 21 वनडे आणि 58 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आपल्या करिअरमध्ये तो प्रामुख्याने मधल्या फळीतील फलंदाज म्हणून मैदानात उतरायचा. खालच्या फळीमध्ये तो फलंदाजी करून संघासाठी ‘फिनिशर’ची भूमिका निभावत होता. आसिफने आपल्या निवृत्तीची माहिती सोशल मीडियावरील पोस्टमधून दिली.
निवृत्तीची घोषणा करताना आसिफ अलीने काय म्हटलं?
1 सप्टेंबर रोजी 33 वर्षीय आसिफ अलीने सोशल मीडियावर पोस्ट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आपल्या भावनिक संदेशात तो म्हणाला की, “आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करतो आहे. पाकिस्तानची जर्सी परिधान करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होता. आपल्या देशाची सेवा करण्याची संधी मिळाली, हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहेत.” या खास वेळी त्याने आपल्या सहकाऱ्यांचे, प्रशिक्षक मंडळींचे आणि चाहत्यांचेही आभार मानले.
फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहणार आसिफ अली
आसिफ अलीने आपल्या निवृत्तीच्या घोषणेसोबतच हेही स्पष्ट केले आहे की, तो देशांतर्गत क्रिकेट तसेच जगभरातील फ्रँचायझी लीग्समध्ये खेळत राहणार आहे. पाकिस्तानच्या टी-20 संघाचा तो अनेक वर्षे महत्त्वाचा भाग राहिला. 2018 मध्ये इस्लामाबाद युनायटेडला पाकिस्तान सुपर लीग (PSL) चे विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. याच वर्षी त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि अवघ्या दोन महिन्यांनी वनडे संघातही त्याचा समावेश झाला.
आसिफ अलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारी
आसिफ अली 2018 ते 2023 पर्यंत पाकिस्तान संघाचा भाग होता. त्याने ऑक्टोबर 2023 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला. त्याने एप्रिल 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. आसिफने 21 एकदिवसीय सामन्यांमध्ये 25.46 च्या सरासरीने 382 धावा केल्या, ज्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश होता. त्याच वेळी, 58 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 15.18 च्या सरासरीने आणि 133.87 च्या स्ट्राईक रेटने 577 धावा केल्या, त्याची सर्वोत्तम धावसंख्या 41* आहे. तो त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकही शतक करू शकला नाही.
हे ही वाचा -