Mitchell Starc Retirement from T20I News : ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc Retirement) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे तो आता या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी खेळताना दिसणार नाही. 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपपूर्वी त्याने हा मोठा निर्णय घेतला. स्टार्क 2021 च्या टी-20 वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. तो टी-20 वर्ल्डकप 2024 साठी देखील ऑस्ट्रेलियाच्या स्क्वॉडमध्ये सामील होता.

स्टार्कने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम का केला?

टी-20 वर्ल्डकप 2024 नंतर स्टार्कने ऑस्ट्रेलियासाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही. निवृत्ती जाहीर करताना त्याने स्पष्ट केलं की तो आता टेस्ट, वनडे आणि जगभरातील डोमेस्टिक टी-20 लीगसाठी उपलब्ध राहील. म्हणजेच आयपीएलमध्ये त्याचा खेळ सुरूच राहणार आहे. स्टार्कने सांगितलं की टेस्ट आणि वनडेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे.

मिचेल स्टार्कने काय सांगितलं? 

स्टार्क म्हणाला की, “टेस्ट क्रिकेट माझ्यासाठी नेहमीच पहिले प्राधान्य राहिले आहे. ऑस्ट्रेलियासाठी खेळलेल्या प्रत्येक टी-20 सामन्याचा मी आनंद घेतला, विशेषतः 2021 च्या वर्ल्डकपचा. फक्त आपण जिंकलो म्हणूनच नाही, तर आमच्याकडे एक जबरदस्त संघ होता आणि त्या स्पर्धेत खेळताना आम्हाला प्रचंड मजा आली.

भारताचा टेस्ट दौरा, अॅशेज मालिका आणि 2027 चा वनडे वर्ल्डकप लक्षात घेता, या मोठ्या स्पर्धांसाठी फिट आणि सर्वोत्तम कामगिरी राखण्यासाठी हा निर्णय घेणं मला योग्य वाटलं. त्यामुळे आमच्या गोलंदाजी युनिटलाही पुढील काळात टी-20 वर्ल्डकपची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.”

ऑस्ट्रेलियाकडून टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये स्टार्क दुसऱ्या क्रमांकावर

स्टार्कने 2012 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याआधी तो ऑस्ट्रेलियाकडून कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळला होता. स्टार्कने 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान त्याने 23.81 च्या सरासरीने 79 विकेट घेतल्या. टी-20 स्वरूपात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या आधी लेग-स्पिनर अॅडम झम्पाचे नाव आहे. झम्पाने 103 सामन्यांमध्ये 130 विकेट घेतल्या आहेत.

हे ही वाचा - 

Harbhajan Singh : 'हा कसा मोदींचा स्वार्थी हेतू...'; श्रीसंतला कानशिलात मारल्याचा व्हिडिओ लीक झाल्यानंतर हरभजनची पहिली संतप्त प्रतिक्रिया