On This Day: भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधारांपेकी एक असलेल्या महेंद्रसिंह धोनीनं (Mahendra Singh Dhoni) आजच्या दिवशी दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. धोनीचे भारतातचं नव्हे तर, संपूर्ण जगभरात चाहते आहेत. दरम्यान,15 ऑगस्ट 2020 रोजी संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या जल्लोषात न्हाऊन निघाला होता, त्याच वेळी संध्याकाळी एक बातमी आली, ज्या बातमीनं क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. ती म्हणजे यापुढं महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार नाही. धोनीच्या या निर्णयाला आज दोन वर्ष पूर्ण झाली.
महेंद्रसिंह धोनीनं 26 डिसेंबर 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर 15 ऑगस्ट 2020 रोजी महेंद्रसिंह धोनीनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. “सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आज संध्याकाळी 7.29 वाजल्यापासून मला निवृत्त समजलं जावं,” असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्या पोस्टसोबतच धोनीनं एक व्हिडीओही शेअर केला होता.
धोनीची इन्स्टाग्राम पोस्ट-
महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक केलं आहेत. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत. त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 10 हजार 773 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीनं 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्याने एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत.
आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार
आयसीसीच्या सर्व प्रमुख ट्रॉफी (एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा महेंद्रसिंह धोनी पहिला एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतानं 2007 मध्ये पहिल्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं. त्यानंतर 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकवून क्रिकेटविश्वात भारताचा झेंडा फडकवला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं आणखी एक पराक्रम केलाय. 2013 च्या आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचला.
धोनीची आयपीएलमधील कामगिरी
आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपरकिंग्जच्या संघाचं नेतृत्व करताना दिसत आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघानं आतापर्यंत चार वेळा आयपीएलचा खिताब जिंकला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाच्या यादीत चेन्नईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, मुंबई इंडियन्सचा संघ पाच ट्रॉफीसह अव्वल स्थानी आहे.
हे देखील वाचा-