Asia Cup 2022: येत्या 27 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा आशिया चषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज झालाय. भारतानं आतापर्यंत सात वेळा आशिया चषक जिंकलंय. दरम्यान, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारत आठव्यांदा आशिया चषक जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. याशिवाय, रोहित शर्माकडं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खास विक्रम मोडण्याची संधी उपलब्ध झालीय. रोहित शर्मानं आगामी आशिया चषकात 89 धावा केल्या तर तो आशिया चषकात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरेल. या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे.
सचिननं आशिया चषकाच्या 23 सामन्यांमध्ये 51.10 च्या सरासरीनं 971 धावा केल्या आहेत. तर, रोहित शर्माच्या 27 सामन्यांमध्ये 42.04 च्या सरासरीनं 883 धावा आहेत. रोहित शर्मा सचिनचा विक्रम मोडण्यापासून फक्त 89 धावा दूर आहे. या शर्यतीत विराट कोहलीही तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली रोहितपेक्षा 117 आणि सचिनच्या 205 धावांनी मागं आहे. कोहलीने या स्पर्धेत खेळल्या गेलेल्या 16 सामन्यांमध्ये 63.83 च्या सरासरीनं 766 धावा केल्या आहेत. या यादीत 690 धावांसह भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी चौथ्या क्रमांकावर आहे.
आशिया चषकात सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज-
क्रमांक | भारतीय फलंदाज | धावा |
1 | सचिन तेंडुलकर | 971 |
2 | रोहित शर्मा | 883 |
3 | विराट कोहली | 766 |
4 | महेंद्रसिंह धोनी | 690 |
दरम्यान, आशिया चषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसूर्याचं नाव आहे. सनथ जयसूर्यानं आशिया चषकातील 25 सामन्यात 1 हजार 220 धावा केल्या आहेत. या यादीत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकार दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 1 हजार 75 धावांची नोंद आहे. त्यानंतर सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हे देखील वाचा-