IND vs SL ODI World Cup 2023 : वानखेडेच्या मैदानावर श्रीलंकेचा पराभव करत भारताने विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. भारताचा हा सलग सातवा विजय होय. यंदाच्या विश्वचषकात सेमीफायनलमध्ये पोहचणारा भारत पहिला संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने आपला फॉर्म कायम राखत विजय नोंदवला. भारतीय संघाने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान काबिज केलेय.
भारताने सलग सात सामन्यात विजय मिळवलाय. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंना सर्वस्वी योगदान दिले. सांघिक खेळाच्या बळावर टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी धावांचा पाऊस पाडला तर गोलंदाजी सिराज, बुमराह आणि शामी यांनी कमाल केली. त्याशिवाय अय्यर, राहुल, कुलदीप आणि जाडेजा यांचेही मोलाचे योगदान आहे.
भारतीय संघाचा विश्वचषकातील प्रवास -
8 ऑक्टोबर -
चेन्नईच्या मैदानावर पाच वेळच्या विश्वचषक विजेत्याचा पराभव करत भारताने दणक्यात सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 199 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल भारताची सुरुवात अतिशय खराब झाली होती. रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि ईशान किशन खातेही न उघडता तंबूत परतले होते. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी विजय खेचून आणला होता. विराट कोहलीने 85 तर केएल राहुलने 97 धावांची खेळी केली.
11 ऑक्टोबर -
दिल्लीच्या मैदानात टीम इंडियाने अफगाण संघाचा धुव्वा उडवला. अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 272 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल टीम इंडियाने हे आव्हान आठ विकेट्स राखून सहज पार केले. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या विजयाचे हिरो ठरले.
14 ऑक्टोबर -
अहमदाबाद येथील हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात विकेट्सने पराभव केला. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 191 धावांपर्यंत मजल मारली. बाबर आझम याने अर्धशतकी खेळी केली. पाकिस्तानची सुरुवात अतिशय चांगली झाली होती. पण त्यानंतर फलंदाजी ढेपाळली. भारताने पाकिस्तानचे हे आव्हान तीन विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.
19 ऑक्टोबर -
पुण्यात बांगलादेशचा सात विकेट्सने पराभव करत भारताने विश्वचषकात विजयी चौकार मारला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 256 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल भारताने हे आव्हान तीन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. विराट कोहलीने नाबाद शतक झळकावले.
22 ऑक्टोबर -
भारताने तब्बल 20 वर्षांनंतर विश्वचषकाच्या मैदानात न्यूझीलंडचा पराभव केला. धरमशालाच्या मैदानात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 273 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल भारताने हे आव्हान चार विकेट्स राखून सहज पार केले. विराट कोहलीने शानदार अर्धशतक ठोकले. मोहम्मद शामीने पाच विकेट्स घेतल्या.
29 ऑक्टोबर -
गतविजेत्या इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करत भारताने विजयाचा षटकार मारला. लखनौच्या मैदानात प्रथम फलंदाजी करताना भारताने फक्त 229 धावांपर्यंत मजल मारली. पण भारताच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत या माफक आव्हानाचा बचाव केला. इंग्लंडचा संपूर्ण संघ 129 धावांत संपुष्टात आला. मोहम्मद शामीने चार विकेट्स घेतल्या. रोहित शर्माने संयमी अर्धशतक ठोकले.
2 नोव्हेंबर -
वानखेडेच्या मैदानात भारताने श्रीलंकेला पराभवाचा जोरदार धक्का दिला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 357 धावांचा डोंगर उभरला. विराट कोहली, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके ठोकली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेच्या फलंदाजांन सपशेल नांगी टाकली. सिराज, बुमराह आणि शामीच्या माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी लोटांगण घातले.
भारताचे पुढील सामने -
भारताचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेसोबत कोलकात्यामध्ये होणार आहे. रविवारी 5 ऑक्टोबर रोजी दोन संघ भिडणार आहेत. तर भारताचा अखेरचा सामना नेदरलँड्सविरोधात 12 नोव्हेंबर रोजी बेंगळुरुत होणार आहे.
भारताची फलंदाजी कशी राहिली ?
विश्वचषकात भारताचे सर्वच फलंदाज फॉर्मात आहेत. विराट, रोहित यांच्यासह राहुल, अय्यर यांनीही मोलाचे योगदान दिले. तळाला रविंद्र जाडेजाही महत्वाच्या खेळी करत आहे. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक धावा झाल्या आहेत. विराट कोहलीने 5 अर्धशतके आणि एका शतकाच्या मदतीने सात डावात 442 धावांचा पाऊस पाडलाय. विराट कोहली फक्त एका सामन्यात शून्यावर बाद झालाय. दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहितने सात सामन्यात 402 धावा केल्या आहेत. केएल राहुल याने सहा डावात 237 धावा चोपल्या आहेत. श्रेयस अय्यर यानेही सात सामन्यात 216 धावा केल्या आहेत.
भारतीय गोलंदाजांची कामगिरी -