IND Vs SL, Innings Highlights : विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी पाया रचला, तर श्रेयस अय्यरने याने चौकार-षटकार लगावत फिनिशिंग टच दिला. वानखेडेच्या मैदानावर भारताने निर्धारित 50 षटकांत 8 विकेट्सच्या मोबदल्यात 357 धावांपर्यंत मजल मारली. शुभमन गिल 92, विराट कोहली 88 आणि श्रेयस अय्यर 82 यांनी शानदार अर्धशतके ठोकली. श्रीलंकेकडून मधुशंका याने पाच विकेट घेतल्या. श्रीलंकेला विजयासाठी 358 धावांचे आव्हान मिळालेय.
आधी गिलचे शतक हुकले, मग कोहलीही नर्वस 90 चा शिकार
वानखेडेच्या मैदानावर किंग विराट कोहली आणि प्रिन्स शुभमन गिल यांची शतके हुकली. श्रीलंकेच्या मधुशंकाने दोघांनाही तंबूत पाठवले. शुभमन गिल 92 तर विराट कोहली 88 धावांवर बाद झाला. रोहित शर्मा दुसऱ्या चेंडूवर बाद झाल्यानंतर विराट आणि गिल यांनी भारताच्या डावाला आकार दिला होता. दोघांमध्ये 189 धावांची भागीदारीही झाली. पण दोघांना शतके ठोकता आली नाहीत.
सचिनच्या विक्रमापासून विराट अद्याप दूरच -
विराट कोहलीला पुन्हा एकदा शतकाने हुलकावनी दिली. विराट कोहली वानखेडेवर वनडेतील 49 वे शतक ठोकेल, अशीच सर्वांना आशा होती. पण लयीत असणाऱ्या विराट कोहलीला मधुशंकाने तंबूत पाठवले. विराट कोहलीने वानखेडेवर रुबाबदार सुरुवात केली होती. त्याने एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देत दावसंख्या हालती ठेवली होती. शतकाच्या जवळ गेल्यानंतर विराट कोहलीची बॅट थोडी शांत झाली, अन् तिथेच श्रीलंकेच्या मधुशंकाने डाव साधला. मधुशंकाच्या गोलंदाजीवर विराट कोहली बाद झाला. विराट कोहलीने 94 चेंडूत 88 धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने 11 चौकार लगावले.
शुभमन गिल रंगत परतला, पण शतक हुकले -
युवा शुभमन गिल आज लयीत दिसत होता. वानखेडेच्या मैदानावर त्याने चौफेर फटकेबाजी केली. गिल सुरुवातीला थोडा चाचपडला, पण एकदा जम बसल्यानंतर लंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने 92 चेंडूत 92 धावा केल्या. गिल याने आपल्या खेळीत दोन षटकार आणि 11 चौकार लगावले. गिल याचा डावही मधुशंका यानेच संपुष्टात आणला.
अय्यरचा झंझावत -
श्रेयस अय्यरने वानखेडे स्टेडियमवर षटकारांचा पाऊस पाडला. शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी पाया रचल्यानंतर अय्यरने फिनिशिंग टच दिला. अय्यरने अवघ्या 56 चेंडूमध्ये 82 धावांचा पाऊस पाडला. अय्यरने या खेळीत सहा गगनचुंबी षटकार लगावले तर तीन चौकार ठोकले. विराट बाद झाल्यानंतर अय्यरने लंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. अय्यरने आधी केएल राहुलसोबत 60 धावांची भादिदारी केली. त्यानंतर रविंद्र जाडेजासोबत 36 चेंडूत 57 धावा जोडल्या. अखेरच्या षटकात अय्यरने फटकेबाजी केल्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या वाढली. अय्यरने विश्वचषकातील दुसरे अर्धशतक ठोकले.
जाडेजाचा फिनिशिंग टच -
अय्यर बाद झाल्यानंतर अखेरच्या 3 षटकात रविंद्र जाडेजाने चार्ज केला. जाडेजाने वादळी फलंदाजी करत भारताची धावसंख्या 350 पार नेली. जाडेजाने 24 चेंडूत 35 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने एक षटकार आणि एक चौकार मारला. जाडेजाने शामीसोबत 11 चेंडूत 22 धावांची महत्वाची भागिदारी केली.
सूर्या-राहुल अन् रोहित फेल -
सूर्यकुमार यादव आणि राहुल यांना मोठी खेळी करता आली नाही. चांगल्या सुरुवातीनंतर फिनिशिंगची जबाबदारी असणारे हे दोन्ही फलंदाज लगेच तंबूत परतले. केएल राहुल याने 19 चेंडूत दोन चौकाराच्या मदतीने 21 धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादव याने 9 चेंडूत दोन चैकाराच्या मदतीने 12 धावा जोडल्या. केएल राहुल याला चांगली सुरुवात मिळाली पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. पहिल्या चेंडूवर रोहित शर्माने खणखणीत चौकार लगावला होता. पण दुसऱ्याच चेंडूवर तो तंबूत परतला. मोहम्मद शामी दोन धावांवर बाद झाला.
लंकेचे गोलंदाज फ्लॉप -
भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेची गोलंदाजी फेल ठरली. प्रत्येक गोलंदाजाला वानखेडे मार बसला. मधुशंका याने भारताच्या पाच फलंदाजांना बाद केले, पण त्याला मारही तितकाच बसला. मधुशंका याने 10 षटकात 80 धावा खर्च करत 5 विकेट्स घेतल्या. चमिरा याने 10 षटकात 71 धावा खर्च करत एक विकेट घेतली. रजिता, मॅथ्युस, तिक्ष्णा यांना एकही विकेट मिळाली नाही.