SA Vs AUS, Innings Highlights : ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यापुढे आफ्रिकेची फलंदाजांनी गुडघे टेकले. डेविड मिलरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणाचा सामना एकट्या डेविड मिलर याने केला. मिलरच्या झंझावती शतकी खेळीच्या बळावर आफ्रिकेनं 212 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि ट्रेविस हेड यांनी भेदक मारा केला.  ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 213 धावांचे माफक आव्हान आहे.


मिलर एकटाच लढला - 


ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यापुढे आफ्रिकेच्या फलंदाजांनी नांगी टाकली होती. 24 धावांत आफ्रिकेचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले होते. फ्रिकेचा डाव लवकर संपणार का? असेच वाटत होते. पण डेविड मिलर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला एकटा नडला. आधी खेळपट्टीवर स्थिरावला. त्यानंतर गोलंदाजांचा समाचार घेतला. मिलर याने क्लासेन याच्यासोबत 95 धावांची भागिदाी केली. कर गॅराल्ड कोएत्ज़ी याच्यासोबत 53 धावा जोडल्या. त्याशिवाय आफ्रिकेला एकही मोठी भागिदारी करता आली नाही. डेविड मिलर याला क्लासेन आणि गॅराल्ड कोएत्ज़ी यांनी साथ दिली... पण त्या दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही.  डेविड मिलर याने 116 चेंडूत 5 षटकार आणि आठ चौकारांच्या मदतीने 101 धावांची शानदार खेळी केली. 


क्लासेनचाही लढा, पण...


हेनरिक क्लासेन याने डेविड मिलर याला चांगली साथ दिली. 24 धावांवर आफ्रिकेचे 4 फलंदाज माघारी परतले, त्यानंतर मिलर आणि क्लासेन यांनी डाव सावरला. दोघांनीही सुरुवातीला संयमी खेळी केली. त्यानंतर फटकेबाजीला सुरुवात केली. दोघांनाही चौफेर फटकेबाजी केली. हेनरिक क्लासेन याला चांगली सुरुवात मिळाली, पण त्याला मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. क्लासेन याने 48 चेंडूत 47 धावांची खेळी केली. यामध्ये चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. क्लासेन याच्याशिवाय अखेरीस गॅराल्ड कोएत्ज़ी यानेही मिलरला साथ दिली.. पण तो फारकाळ टिकू शकला नाही. गॅराल्ड कोएत्ज़ी याने 39 चेंडूत दोन चौकाराच्या मदतीने 19 धावा जोडल्या. या दोघांचा अपवाद वगळता इतर सर्व फलंदाज फ्लॉप गेले. 


आफ्रिकेचे फलंदाज ढेपाळले -


यंदाच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेची फंलदाजी तगडी मानली जात होती. प्रथम फलंदाजी करताना ते 400 धावांचा डोंगर उभारतात, असेच आतापर्यंत दिसले. पण आज ऑस्ट्रेलियापुढे दिग्गजांनी नांगी टाकली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी कऱणाऱ्या आफ्रिकेचा कर्णधारच गोल्डन डक झाला. टेम्बा बवुमा याला खातेही उघडता आले नाही. क्विंटन डि कॉक याला फक्त तीन धावा करता आल्या. रासी डुसेन याला सहा धावा करता आल्या. एडन मार्करम याला 10 धावा करता आल्या. मार्को यान्सन याला खातेही उघडता आले नाही. केशव महाराज चार दावा काढून बाद झाला. 


ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी - 


ऑस्ट्रेलियाच्या सर्वच गोलंदाजांनी भेदक मारा केला. मिचेल स्टार्क आणि हेजलवूड यांनी आफ्रिकेच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. मिचेल स्टार्क याने 10 षटकात 34 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. ग्लेन मॅक्सवेल याला विकेट मिळाली नाही, पण त्याने 10 षटकात फक्त 35 धावा दिल्या. ट्रेविस हेड याने 5 षटकात 21 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. अॅडम झम्पा आज महागडा ठरला... झम्पाला विकेट मिळाली नाहीच, पण गोलंदाजीही प्रभावहीन वाटली. झम्पाने सात षटकात 55 धावा खर्च केल्या.  पॅट कमिन्स यानेही तीन विकेट्स घेतल्या. 9.4 षटकात 51 धावा खर्च करत तीन विकेट घेतल्या. जोश हेजलवूड याने अचूक टप्प्यावर भेदक मारा केला. त्याने आठ षटकात फक्त 12 धावा खर्च केल्या, त्याशिवाय दोन विकेट्सही घेतल्या.