IND vs AUS, ODI World Cup 2023: आज भारतीय क्रिकेट संघ (Team India) विश्वचषकात (ODI World Cup 2023) पहिला सामना होणार आहे. कांगारुंविरुद्धच्या सामन्यानं टीम इंडिया विश्वचषकातील आपली मोहीम सुरू करणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 8 ऑक्टोबर (रविवार) रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. हा ब्लॉकबस्टर सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल.


टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या मैदानात एकमेकांविरोधात उतरणार आहेत. आतापर्यंत एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा राहिला आहे. ऑस्ट्रेलियानं विक्रमी पाच वेळा विश्वचषक जिंकला आहे, तर टीम इंडियानं दोनदा विश्वचषक पटकावला आहे. टीम इंडियाचे धुरंधर आपल्या खेळीनं सर्वांना चकीत करतातच, पण यामध्ये ऑस्ट्रेलियाचे शिलेदारही काही कमी नाहीत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघातील काही खेळाडू टीम इंडियाचं टेन्शन नक्कीच वाढवू शकतात. तसं पाहिलं तर ऑस्ट्रेलियन संघात अशा खेळाडूंची फौज आहे, जी आजच्या सामन्यात टीम इंडियाचा ताण वाढवू शकतात. अशा परिस्थितीत टीम इंडियाला कांगारुंना काहीही करुन माघारी धाडावं लागेल., म्हणजेच, विकेट्स घ्यावे लागतील. जाणून घेऊयात, ऑस्ट्रेलियाच्या धुवाधार फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंबाबत... 




डेविड वॉर्नर (David Warner)


ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज ओपनर डेविड वॉर्नरला भारतातील पीचवर क्रिकेट खेळण्याचा तगडा अनुभव आहे. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेतही त्यानं तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतकं झळकावली होती, त्यामुळे डेव्हिड वॉर्नरला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्याचं आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असेल. वॉर्नरनं आतापर्यंत टीम इंडिया विरोधात 25 एकदिवसीय सामन्यांमध्ये 51.04 च्या सरासरीनं 1174 धावा केल्या आहेत.




स्टीव्ह स्मिथ (Steve Smith)


टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात भारतासाठी सर्वात मोठा धोका ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ असणार आहे. स्मिथनं आतापर्यंत भारताविरुद्धच्या 27 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1260 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी 54.78 इतकी आहे. एकदा स्मिथ क्रीजवर स्थिरावला की त्याला पुन्हा माघारी धाडणं कधीकधी साक्षात परमेश्वरालाही कठीण होऊन जातं. स्मिथचं वादळ रोखणं भल्या भल्या गोलंदाजांना शक्य होत नाही. अशा परिस्थितीत स्मिथला क्रिजवर स्थिरावण्यापूर्वीच पॅव्हेलियनमध्ये पाठवावं लागणार आहे.




मिचेल स्टार्क (Mitchell Starc)


टीम इंडियाला कांगारुंच्या डावखुऱ्या गोलंदाजांपासून सावध राहावं लागणार आहे. स्टार्क मुख्यतः टीम इंडियाच्या सलामीवीर आणि स्टार फलंदाजांना लक्ष्य करतो. मिचेल स्टार्कनं टीम इंडियाविरुद्धच्या 17 एकदिवसीय सामन्यांमध्ये 26 विकेट घेतल्या आहेत. या काळात त्यानं रोहित शर्माचा तिनदा विकेट घेतला आहे. त्यानं शुभमन गिल आणि सुर्यकुमार यादवला 2-2 वेळा विकेट्स घेतल्या आहेत.




पॅट कमिन्स (Pat Cummins)


ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणला जातो. पॅट कमिन्सला नियंत्रणात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कमिन्सनं आतापर्यंत टीम इंडियाविरुद्ध 19 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात 26 बळी घेतले आहेत. खालच्या फळीतील फलंदाज म्हणून कमिन्सही टीम इंडियाचा ताण वाढवू शकतो.




अॅडम झाम्पा (Adam Zampa)


कांगारूंचा हुकुमी एक्का अॅडम झाम्पा. अॅडम आपल्या जाळ्यात भारतीय फलंदाजांना अडकवण्यात पटाईत आहे. झाम्पानं भारताविरुद्ध 21 एकदिवसीय सामन्यांमध्ये 34 बळी घेतले आहेत. झाम्पानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा 5 वेळा विकेट घेतला आहे. रोहित शर्मालाही त्यानं चार वेळा पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला झाम्पापासून सावध राहावं लागेल.


टीम इंडिया (संभाव्य प्लेईंग-11)


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल/ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. 


ऑस्ट्रेलिया (संभाव्य प्लेईंग-11)


मार्कस स्टोयनिस अद्याप पूर्णपणे रिकव्हर झालेला नाही. अशातच त्याच्याऐवजी कॅमरुन ग्रीनला संधी मिळण्याची शक्यता आहे. 


डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरून ग्रीन, एलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिंस (कर्णधार), जोश हेजलवुड, एडम जम्पा.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IND vs AUS Weather Forecast: टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात पावसाचा वरचष्मा? कसं असेल चेन्नईतील हवामान?