कानपूर : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिला कसोटी सामना अतिशय चढाओढीचा झाला. भारत न्यूझीलंडला सर्वबाद करु न शकल्याने अखेर सामना अनिर्णीत सुटला. यावेळी अधूंक सूर्यप्रकाश हे एक मोठं कारण असलं तरी सोबतच रचिन रवींद्र (Rachin Ravindra) या नावाने भारतीय खेळाडूंच्या नाकात दम करुन ठेवला होता. अखेरपर्यंत क्रिजवर टिकून राहिलेल्या रचिनने 91 चेंडूत केवळ 18 धावा करत अखेरपर्यंत भारताला जिंकू दिलं नाही. विशेष म्हणजे न्यूझीलंडचा हा युवा खेळाडू मूळचा भारतीय वंशाचा असून रचिनच्या नावामागेही भारतीय क्रिकेट हेच कारण आहे. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या नावातील 'र' आणि सचिन तेंडुलकरच्या नावातील 'चिन' यांतून रचिन हे नाव रचिनचे वडील रवी कृष्णमूर्ती यांनी दिलं. 


मूळचे भारतीय असणारे रवी कृष्णमूर्ती हे 90 च्या दशकात पत्नीसोबत न्यूझीलंडला शिफ्ट झाले. त्याच ठिकाणी वेलिंग्टन येथे 18 नोव्हेंबर, 1999 रोजी रचिनचा जन्म झाला. रचिनचे वडील न्यूझीलंडला शिफ्ट होण्यापूर्वी भारताचा दिग्गज क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ याच्यासह बंगळुरु येथे क्रिकेट खेळले होते. त्यामुळे मूळचे क्रिकेट फॅन असणाऱ्या रवी यांनी त्यांच्या मुलालाही क्रिकेटपटूच बनवलं. रचिन न्यूझीलंडच्या हट हॉक्स क्लबमध्ये खेळायला लागल्यावर 13 वर्षाचा असल्यापासून तो दरवर्षी भारतात अनंतपूर, आंध्रप्रदेश याठिकाणी खेळायला येत आहे. पण आतापर्यंत भारतातील अधिकांना रचिनबद्दल माहित नसलं तरी आज मात्र भारताच्या विजयात त्याने केलेल्या अडथळ्यामुळे सर्वांना रचिन चांगलाच माहित झाला आहे.


कोण आहे रचिन रवीद्रं?


22 वर्षीय रचिनने 2016 साली न्यूझीलंडच्या अंडर 19 संघातून क्रिकेट विश्वचषकात सहभाग घेतला. त्यानंतर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 2018 मध्ये पाकिस्तान-न्यूझीलंड सामन्यात रचिन पहिला सामना खेळला. ज्यानंतर एप्रिल, 2021 मध्ये रवींद्र इंग्लंडविरुद्धच्या कसोटी दौऱ्यावर न्यूझीलंड संघातून पहिल्यांदा खेळला. त्यानंतर बांग्लादेश, पाकिस्तानसोबतही रचिन खेळला. पण भारताविरुद्धचा त्याचा पहिला सामना चांगलाच यादगार ठरला.


असा झाला सामना


भारतानं पहिल्या डावात 345 आणि दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 234 धावा करून डाव घोषीत केला. दुसरीकडं न्यूझीलंडनं पहिल्या डावात 295 धावा केल्या होत्या. ज्यामुळं भारताला 49 धावांची आघाडी मिळाली. ज्यानंतर श्रेयस आणि साहा यांच्या अर्धशतकासह भारताने 234 धावा स्कोरबोर्डवर लावत न्यूझीलंडला विजयासाठी 284 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या न्यूझीलंडने 9 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली. सामना हातातून शेवटपर्यंत न्यूझीलंडच्या खेळाडूंनी गमावला नाही. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अतिशय संयमी खेळी केली. भारताला एका विकेटची गरज असताना रचिन रवींद्र आणि एजाज पटेल या दोघांनी 9 वी विकेट गेल्यानंतर पुढचे 52 चेंडू खेळून काढले. 52 चेंडूत केवळ 10 धावा करत त्यांनी सामना अनिर्णीत करण्यात यश मिळवलं. 





हे ही वाचा-