IND vs NZ 2021, 1st Test: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित ठरलाय. कानपूरच्या ग्रीन पार्कवर  (Green Park) खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघानं न्यूझीलंडच्या संघासमोर 284 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. अंधुक प्रकाश आणि एक विकेट्सच्या अडथळ्यामुळं भारताचा विजय हिरावला गेला. हा सामन्या जिंकण्यासाठी भारताला एक केवळ एका विकेट्सची गरज असताना न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रनं संयमी खेळी करीत विकेट्स घेऊ दिली नाही. अखेर पंचानी दिवसाचा खेळ संपल्याचा निर्णय घेतल्यामुळं दोन्ही संघांमधील हा चित्तथरारक सामना अनिर्णित ठरला.


दरम्यान, भारताचे फिरकी गोलंदाज आर अश्विन आणि रविंद्र जाडेजानं चांगली कामगिरी बजावली. या सामन्यात अश्विननं तीन तर, जाडेजानं चार गडी बाद केले. भारतानं पहिल्या डावात 345 आणि दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 234 धावा करून डाव घोषीत केला. दुसरीकडं न्यूझीलंडनं पहिल्या डावात 295 धावा केल्या होत्या. ज्यामुळं भारताला 49 धावांची आघाडी मिळाली. 


शेवटच्या दिवशी किवी संघाची सुरुवात चांगली झाली. भारताच्या गोलंदाजांना पहिल्या सत्रात एकही गडी बाद करता आला नाही. टॉम लॅथम आणि विल्यम सोमरविले यांनी दुसऱ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. उमेश यादवनं लंच ब्रेकनंतर सोमरविलेला बाद करून भारताला पहिलं यश मिळवून दिलं. सोमरविलेनं 110 चेंडूत पाच चौकार मारून 36 धावा केल्या. त्यानंतर आर अश्विननं टॉम लॉथमला माघारी धाडलं. 


टॉम लॅथमनं 146 चेंडूंचा सामना केला. त्यानं 52 धावा केल्या. ज्यात तीन चौकारांचा समावेश आहे. टी ब्रेक आधी रवींद्र जडेजानं रॉस टेलरला (2 धावा) पायचीत केलं. शेवटच्या सत्रात प्रथम जडेजानं केन विल्यमसनला आणि अक्षर पटेलनं हेन्री निकोल्सला बाद करत संघाला मोठे यश मिळवून दिलं. ज्यामुळं सामना भारताच्या बाजूनं फिरला. मात्र, अंधुक प्रकाश आणि रचिन रवींद्रनं संयमी खेळीमुळं भारताच्या हातात आलेल्या विजय निसटला. 


भारतात चार वर्षानंतर पहिल्यांदाच कसोटी सामना अनिर्णित ठरला. भारतात याआधी 2017 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्या दिल्लीत खेळण्यात आलेल्या सामना अनिर्णित ठरला होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना तीन डिसेंबरपासून मुंबईत रंगणार आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA