New Zealand Win Over South Africa In Semi Final by 50 Runs : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव केला आणि त्यांना घरचा रस्ता दाखवला. यासह, अंतिम फेरीत पोहोचणारा न्यूझीलंड हा दुसरा संघ बनला आहे. याचा अर्थ असा की, 9 मार्च रोजी दुबई येथे होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यात टीम इंडियाशी आता न्यूझीलंडचा संघ भिडले. 5 मार्च रोजी लाहोरमध्ये झालेल्या उपांत्य सामन्यात किवी संघाने प्रथम फलंदाजी करताना 363 धावांचे लक्ष्य ठेवले होते. याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 9 विकेट गमावून फक्त 312 धावाच करू शकला.






डेव्हिड मिलर एकटा नडला, पण कमी पडला


लाहोरमध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर, त्याच्या संघाने 50 षटकांत 363 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले, ज्यासमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. पहिल्या षटकापासून किवी गोलंदाजांनी जोरदार गोलंदाजी केली आणि धावा काढण्याची एकही संधी दिली नाही. या दबावाखाली दक्षिण आफ्रिकाचा संघ गेला, त्यामुळे मॅट हेन्री आऊट झाला. पण, यानंतर कर्णधार टेम्बा बावुमा आणि रॅसी व्हॅन डर ड्यूसेन यांच्यात 105 धावांची भागीदारी झाली. पण संथ खेळामुळे दबाव वाढतच गेला. त्याचा परिणाम दिसून आला. 125 धावांवर बावुमा आऊट झाल्यानंतर, कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही आणि नियमित अंतराने विकेट गमावल्या. संघाने तिसरी विकेट 161 धावांवर आणि चौथी विकेट 167 धावांवर गमावली.






अर्धा संघ 189 धावांवर तंबुत बसला होता. पुढील 29 धावा करताना दक्षिण आफ्रिकेने आणखी 3 विकेट गमावल्या. शेवटी, डेव्हिड मिलरने एकट्याने झुंज दिली आणि 67 चेंडूत 100 धावा केल्या. पण त्याच्या खेळीचा काही फायदा झाला नाही. त्याच्याशिवाय बावुमाने 71 चेंडूत 56 धावा, व्हॅन डर ड्यूसेनने 66 चेंडूत 69 धावा आणि एडेन मार्करामने 29 चेंडूत 31 धावा केल्या.


केन विल्यमसन आणि रचिन रवींद्रचा तडाखा!


प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने विल यंगची विकेट लवकर गमावली, तो 21 धावा करून बाद झाला. पण,यानंतर रचिन आणि विल्यमसन यांनी शानदार भागीदारी केली आणि दुसऱ्या विकेटसाठी 164 धावांची भागीदारी केली. यादरम्यान, रचिनने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पाचवे शतकही झळकावले. शतक ठोकल्यानंतर रचिन आऊट झाला. त्याने 101 चेंडूत 13 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 108 धावा केल्या. यानंतर, विल्यमसननेही याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 15 वे शतक झळकावण्यात तो यशस्वी झाला. विल्यमसनने 94 चेंडूत 10 चौकार आणि दोन षटकारांसह 102 धावा काढल्यानंतर बाद झाला. 


विल्यमसन आणि रचिन आऊट झाल्यानंतर टॉम लॅथम चार धावा करून बाद झाला. पण, डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी एक शानदार भागीदारी केली आणि संघाचा धावसंख्या 300 च्या पुढे नेला. मिशेल अर्धशतक हुकला आणि 37 चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 49 धावा काढून बाद झाला. दरम्यान, मायकेल ब्रेसवेलने 12 चेंडूत 16 धावा केल्या. फिलिप्स शेवटपर्यंत खेळत राहिला आणि 27 चेंडूत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 49 धावा काढत नाबाद परतला. कर्णधार मिचेल सँटनर दोन धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या, तर कागिसो रबाडाने दोन आणि वियान मुल्डरने एक विकेट घेतली.