'Mahila Samman Mahapanchayat' on May 28 in front of the New Parliament building : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, 28 मे रोजी संसदेच्या नव्या इमारतीचे (New Parliament Building) उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. पण आता कुस्तीपटूंनी 28 मे रोजी नव्या संसदेला घेराव घालण्याची तयारी सुरु केली आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या पैलवानांनी आंदोलन पुकारले आहे. 28 मे रोजी नव्या संसद भवनाबाहेर आंदोलन करणार असल्याची माहिती कुस्तीपटू साक्षी मलिकने दिली आहे.  


भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या अटकेच्या मागणीवर कुस्तीपट्टू ठाम आहेत. महिनाभरापासून कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु आहे. 23 मे रोजी दिल्लीत इंडिया गेटवर कँडल मार्च काढल्यानंतर आता महिला पंचायतच्या तयारीला वेग आलाय. यामध्ये सामील होण्यासाठी पैलवानांनी लोकांना आवाहन केलेय. कुस्तीपट्टूंनी आज पत्रकार परिषद घेत 28 मे रोजी आंदोलन करणार असल्याची माहिती दिली. 






28 मे रोजी संसदेच्या नव्या इमारतीचे (New Parliament Building) उद्घाटन  होणार आहे. त्याच दिवशी नव्या संसदेला घेराव करण्यात येणार आहे. हरियाणासह इतर राज्यातून लोक आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. साक्षी मलिकने याबाबत माहिती दिली. साक्षी म्हणाली की,  दिल्लीमध्ये 28 मे रोजी महिला महापंचायत आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये सामील होण्यासाठी सिंधू बॉर्डर, टिकरी, गाजीपूर बॉर्डर येथून समर्थक येणार आहेत. आल्यानंतर आधी सर्वजण नाश्ता करतील. त्यानंतर  11:30 वाजता मार्च काढण्यात येईल. पोलीस जे काही कृत्य करतील, त्यावर आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले तरीही आमचे आंदोलन थांबणार नाही. पोलीस जिथे थांबवतील, तिथेच आंदोलन करण्यात येईल. 
 
या कार्यक्रमासाठी परवानगी मागण्यात येईल. त्यासाठी पोलिसांना पत्र पाठवण्यात येणार आहे. परवानगी मिळाली नाही, तर त्याची माहिती लगेच देऊयात, असे साक्षी मलिक म्हणाली.