Nathan Lyon Test Record:

  ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज नॅथन लियॉनने (Nathon Lyon) वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करत एक मोठा विक्रम नावावर केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर. अश्विन (R Ashwin) यांना मागे टाकत लियॉन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा आठवा गोलंदाज ठरला आहे.


वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात काइल मेयरला बाद करताच ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लियॉनने अश्विनला मागे टाकले. आता त्याच्या नावावर 446 कसोटी विकेट्स झाल्या आहेत. त्याचबरोबर अश्विनच्या नावावर 442 कसोटी विकेट आहेत. त्यामुळे या खास रेकॉर्डसह नॅथन आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा आठवा गोलंदाज बनला आहे. नॅथन लियॉनने आपल्या 111व्या कसोटी सामन्यात ही विशेष कामगिरी केली आहे. दुसरीकडे, अश्विनने भारतासाठी आतापर्यंत 86 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 442 फलंदाजांची शिकार केली आहे. नॅथन लियॉन सध्या ऑस्ट्रेलियन संघातील सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. त्याने ऑस्ट्रेलियन संघासाठी बऱ्याच सामन्यात मॅचविनिंग गोलंदाजी केली आहे.


अश्विनकडे पुन्हा पुढे जाण्याची संधी


भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनकडे अजूनही नॅथन लियॉनला मागे सोडण्याची चांगली संधी आहे. बांगलादेशविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत अश्विनने चमकदार गोलंदाजी केल्यास तो नॅथन लियॉनला मागे टाकेल आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा आठवा गोलंदाज बनू शकतो. अश्विनची गोलंदाजी पाहता कसोटी संघात त्याला नक्कीच संधी मिळू शकते. भारत सध्या एकदिवसीय मालिका बांगलादेशविरुद्ध खेळत असून त्यानंतर कसोटी मालिका खेळणार आहे.


कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज


मुथय्या मुरलीथरन (श्रीलंका)- 800


शेन वॉर्ने (ऑस्ट्रेलिया)- 708


जेम्स अँडरसन (इंग्लंड)- 668


अनिल कुंबळे (भारत)- 619


स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)- 566


ग्लेन मॅक्ग्राथ (ऑस्ट्रेलिया)- 563


कर्टनी वॉल्श (वेस्ट इंडीज)- 519


नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया)- 446


आर. अश्विन (भारत)- 442


डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)- 439


 हे देखील वाचा-