Murali Vijay Records : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर मुरली विजयने (Murli Vijay) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 30 जानेवारीला त्याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा केला. तो सुमारे 14 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय राहिला. एकेकाळी मुरली विजय भारतीय कसोटी संघाचा नियमित सलामीवीर होता. त्याने 2008 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. 2018 मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मुरली विजय अनेक वर्षांपासून फ्रँचायझी क्रिकेटमध्ये देखील सक्रिय होता.


मुरली विजयने लिहिला भावनिक संदेश  


मुरली विजयने सोशल मीडियावर एक भावनिक संदेश लिहून निवृत्तीची घोषणा केली. त्याने ट्विट करून लिहिले की, ''मी कृतज्ञतेने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. माझा प्रवास 2002 मध्ये सुरू झाला जो 2018 पर्यंत चालू होता. मी बीसीसीआय, तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्ज, चेमप्लास्ट सनमार यांचा आभारी आहे. मी माझे सर्व सहकारी, प्रशिक्षक, मार्गदर्शक, सपोर्ट स्टाफ यांचे आभार मानतो ज्यांच्या नेतृत्वाखाली मी खेळलो. मुरलीने पुढे लिहिले की, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, मी क्रिकेटच्या जगात आणखी नवीन संधी शोधत आहे. मला आवडणाऱ्या आणि नवीन आणि वेगळ्या वातावरणात स्वतःला आव्हान देणाऱ्या खेळात मी सहभागी सक्रियच राहीन.''


मुरली विजयची क्रिकेट कारकीर्द


मुरली विजयने भारतासाठी 61 कसोटी सामने खेळले ज्यात त्याने 3982 धावा केल्या. कसोटीत त्याच्या नावावर 12 शतकं आणि 15 अर्धशतकं आहेत. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 167 धावा होती. याशिवाय त्याने भारतासाठी 17 एकदिवसीय सामने खेळले ज्यात त्याने 339 धावा केल्या. वनडेत अर्धशतक झळकावण्यात तो यशस्वी ठरला. त्याने भारतासाठी 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळले ज्यात त्याने 169 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त, त्याने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व केले.


परदेशी भूमीवर केलेली संस्मरणीय शतकं


मुरली विजयनं कसोटी क्रिकेटमध्ये खासकरुन परदेशी भूमीवर खास कामगिरी केली आहे. त्याची ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची 144 धावांची खेळी आजही अगदी खास मानली जाते. तसंच नॉटिंगहॅममधील त्याची 145 धावांची खेळी क्रिकेट चाहते विसरणार नाहीत. याशिवाय लॉर्ड्सवरील 95, अॅडलेड येथे 99 आणि डर्बन येथे 97 धावांची खेळी या त्याच्या काही अविस्मरणीय खेळी आहेत.


हे देखील वाचा-