नवी दिल्ली : मुख्य प्रशिक्षक गौैतम गंभीर याची आणखी एक मागणी बीसीसीआयनं मान्य केली आहे. भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून झहीर खान, लक्ष्मीपथी बालाजी आणि मोर्ने मॉर्कल यांच्या नावाची चर्चा होती. गौतम गंभीर याच्यासोबत मोर्ने मॉर्कलनं लखनौ सुपर जाएंटस या संघात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केलं होतं. त्यामुळं गौतम गंभीर (Gautam Gambhir) याचं प्राधान्य मोर्ने मॉर्कल (Morne Morkel)याच्या नावाला होतं. अखेर बीसीसीआयनं गौतम गंभीरच्या मतानुसार भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मोर्ने मॉर्कल याच्या नावाची घोषणा केली आहे. आगामी बांगलादेश दौऱ्यापूर्वी मोर्ने मॉर्कलची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड केल्यानं गौतम गंभीर पुढील आव्हानं देखील कमी होणार आहे.
मोर्ने मॉर्कलची भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यास बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ग्रीन सिग्नल दिल्याचं वृत्त क्रिकबझनं दिलं आहे. मोर्न मॉर्कलचा कार्यकाळ 1 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
गौतम गंभीर आणि मोर्ने मॉर्कल यांनी लखनौ सुपर जाएंटसच्या संघाचे मेंटॉर म्हणून सोबत काम केलेलं आहे. मोर्ने मॉर्कल यानं पाकिस्तानच्या संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाजी भूमिका देखील पार पाडली आहे. भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपनंतर मोर्ने मॉर्कलनं पाकिस्तानच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता.
मोर्ने मॉर्कलचं आंतरराष्ट्रीय करिअर
मोर्ने मॉर्कल यानं दक्षिण आफ्रिका संघाकडून क्रिकेट खेळलेलं आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी तो जवळपास 12 वर्ष क्रिकेट खेळत होता. मॉर्कलनं दक्षिण आफ्रिकेसाठी 86 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 309 विकेट काढल्या आहेत. यामध्ये 110 धावा देत 9 विकेट ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. तर, मॉर्कलनं 117 एकदिवसीय सामने खेळले असून त्यानं 188 विकेट काढल्या असून 44 टी20 सामने दक्षिण आफ्रिकेकडून खेळले असून त्यात त्यानं 47 विकेट घेतल्या आहेत.
बांगलादेश मालिकेपूर्वी गौतम गंभीरला दिलासा
भारत आणि श्रीलंका यांच्यात नुकतीच टी 20 आणि वनडे मालिका पार पडली. यापैकी टी 20 मालिकेत भारतानं श्रीलंकेवर विजय मिळवला. मात्र, त्यानंतर झालेल्या वनडे मालिकेत श्रीलंकेकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या गोलंदाजांपेक्षा श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळं आगामी बांगलादेश विरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला गोलंदाजी प्रशिक्षक मिळाल्यानं संघाला दिलासा मिळाला आहे. गौतम गंभीर मोर्ने मॉर्कलच्या साथीनं भारताची गोलंदाजीची फळी आणखी आक्रमक करण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :