Mohammed Shami And Hasin Jahan : टीम इंडियाचा क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शमीची पूर्वीश्रमीची पत्नी हसीन जहाँने (Hasin Jahan) त्याच्या अटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मोहम्मद शमीच्या अटक वॉरंटवर सत्र न्यायालयाने स्थगिती दिली होती. शमीची पत्नी हसीनने आता त्याच्या अटकेसाठी सर्वोच्च न्यायालयाचं दारं ठोठावलं आहे. तिने शमीवर हुंड्यासाठी छळ आणि विवाहबाह्य संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान हे नेमकं प्रकरण काय आणि हसीन जहाँ कोण आहे, हे जाणून घ्या.
कोण आहे हसीन जहाँ?
हसीन जहाँ एक व्यावसायिक मॉडेल आहे. ती मूळची कोलकाताची आहे. ती कोलकाता नाईट रायडर्सची चीअर लीडर देखील होती. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचा विवाह 7 एप्रिल 2014 रोजी झाला होता. या दोघांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही, परंतु ते दोघे वेगळे राहतात. 2018 मध्ये, मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहाँने मारहाण, अत्याचार, हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता.
हसीन जहाँचं दुसरं लग्न
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँचं नातं नेहमीच वादात सापडलं आहे. 2014 मध्ये शमीसोबत लग्न केल्यानंतर हसीन जहाँने मॉडेलिंग सोडलं. हसीनचं हे दुसरं लग्न होतं. शमीने सांगितलं होतं की, हसीन जहाँचे हे दुसरे लग्न असल्याचं त्याला खूप नंतर समजलं. तिच्या पहिल्या पतीचं नाव सैफुद्दीन आहे. 17 जुलै 2015 रोजी शमी आणि हसीनला मुलगी झाली.
नेमकं प्रकरण काय?
मोहम्मद शमी आणि पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. तिने शमीवर गंभीर आरोप केले आहेत. शमीचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्याने हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप हसीन जहाँने केले आहेत. इतकंच नाही तर त्याने दौऱ्यावर असताना कॉल गर्ल्सला हॉटेल रुममध्ये बोलावल्याचा गंभीर आरोपही हसीनने केला आहे. या प्रकरणात, अलीपूरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने 29 ऑगस्ट 2019 रोजी शमीविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. शमीने मात्र या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिलं. यावेळी न्यायालयाने अटक वॉरंट आणि संपूर्ण प्रकरणातील पुढील कार्यवाहीला स्थगिती देण्याचा निर्णय दिला.