Gautam Gambhir PC With Ajit Agarkar: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. श्रीलंका मालिकेपूर्वी या दोघांची पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या पत्रकार परिषदेत गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख आणि मुख्य निवडकर्ता यांनी रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या भवितव्यावर आपले मत व्यक्त केले. सूर्यकुमार यादवला टी-20 फॉरमॅटचा कर्णधार बनवण्यासोबतच मोहम्मद शमीच्या पुनरागमनावरही या दोघांनी प्रतिक्रिया दिली. गौतम गंभीरच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे जाणून घ्या...
विराट कोहली-रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये खेळतील का?
नुकताच भारतीय संघाने टी-20 विश्वचषक जिंकला. भारत विश्वविजेता बनल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 फॉरमॅटला अलविदा केला. पण आता प्रश्न असा आहे की विराट कोहली आणि रोहित शर्मा 2027 मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळणार का? या प्रश्नाच्या उत्तरात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाला की, जर या दोन्ही दिग्गजांची फिटनेस चांगली असेल तर ते नक्कीच खेळतील.
सूर्यकुमार यादव तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार असेल का?
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादव टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. वास्तविक, रोहित शर्मानंतर अष्टपैलू हार्दिक पांड्या भारतीय संघाची धुरा सांभाळेल, असे मानले जात होते, परंतु ही जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे गेली. मात्र, आता सूर्यकुमार यादवला तिन्ही फॉरमॅटमध्ये संधी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाला की, सूर्यकुमार यादव फक्त टी-20 फॉरमॅटमध्येच कर्णधारपद सांभाळेल.
रवींद्र जडेजाला जागा का मिळाली नाही?
श्रीलंका दौऱ्यासाठी रवींद्र जडेजाला टीम इंडियात स्थान मिळाले नाही. पण या अष्टपैलू खेळाडूला वगळण्यात आले आहे की विश्रांती देण्यात आली आहे? भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने स्पष्ट केले की, रवींद्र जडेजाला संघातून वगळण्यात आलेले नाही, त्याला विश्रांती देण्यात आली आहे.
शुभमन गिलचे भवितव्य काय?
शुभमन गिलचा फॉर्म गेल्या काही सामन्यांमध्ये चढ-उतारांनी भरलेला आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियात शुभमन गिलचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाला की, तो भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार आहे.
हार्दिक पांड्याला वगळून सूर्यकुमार यादवला कर्णधार का केले?
सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात आले कारण तो पात्र खेळाडूंपैकी एक आहे. सूर्यकुमार यादव सर्वोत्तम टी-20 मधील फलंदाजांपैकी एक आहे. आम्हाला असा कर्णधार हवा आहे, जो सर्व सामने खेळू शकेल. हार्दिक पांड्याचा फिटनेस त्याच्यासाठी आव्हानात्मक आहे. हार्दिक हा एक अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. परंतु फिटनेस हे एक आव्हान आहे. त्यामुळे नेहमी उपलब्ध असेल, असा एक खेळाडू हवा आहे. यासाठी सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आल्याची माहिती अजित आगरकर यांनी दिली.
मोहम्मद शमी कधी पुनरागमन करणार?
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची भारतीय चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोहम्मद शमी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून परतणार असल्याची माहिती गौतम गंभीरने दिली.
संबंधित बातम्या:
रोहित शर्मा अन् विराट कोहली कधीपर्यंत संघात असणार?; गौतम गंभीरचं पत्रकार परिषदेत धडाधड उत्तर!