Mohammed Shami: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापासून मैदानाबाहेर आहे. भारतात झालेल्या या विश्वचषकात मोहम्मद शमीने सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता.
मोहम्मद शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत करत आहे. याचदरम्याने मोहम्मद शमीने सोशल मीडियावर काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. यामध्ये मोहम्मद शमी नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. विशेष म्हणजे मोहम्मद शमीने वेगवान गोलंदाजीसह लेगस्पिनचाही सराव केला आहे.
मोहम्मद शमी काय म्हणाला?
मोहम्मद शमीने सरावादरम्यानचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये मोहम्मद शमी वर्कआउट करताना, नेटमध्ये वेगवान गोलंदाजी करताना आणि फिरकी गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. मोहम्मद शमीने लेगस्पिन चेंडू अतिशय सहजतेने टाकताना दिसला. या व्हिडीओ शेअर करताना 'मला कठीण परिस्थिती आवडते कारण, ती माझी खरी क्षमता दाखवते', असं मोहम्मद शमी म्हणाला.
मोहम्मद शमी कधी पुनरागमन करणार?
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची भारतीय चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोहम्मद शमी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून परतणार असल्याची माहिती मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने दिली. बांगलादेश 19 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत दोन कसोटी आणि तीन टी-20 सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. यानंतर टीम इंडिया ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
कोहलीवर टीका करणाऱ्यांवर मोहम्मद शमी काय म्हणाला?
अलिकडेच विराट कोहलीबद्दल एका माजी क्रिकेटपटूने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं. भारताचा माजी क्रिकेटपटू अमित मिश्रा याने म्हटलं होतं की, प्रसिद्धी मिळाल्यापासून विराट कोहलीच्या वागणुकीत बदल झाला आहे. आता मोहम्मद शमीने कोहलीबद्दल केलेल्या वक्तव्याचा संदर्भ चाहते अमित मिश्राच्या टीकेशी लावत आहेत. शमीचं हे वक्तव्य अमित मिश्रावर निशाणा असल्याचं बोललं जात आहे.
'हेडलाईन्समध्ये राहण्यासाठी जाणून-बुजून कोहलीविरोधात वक्तव्य'
मोहम्मद शमी अलीकडेच एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केलं. या पॉडकास्टमधील शमीचं वक्तव्य सध्या व्हायरल झालं आहे. शमी म्हणाला की, अनेक माजी क्रिकेटपटूंना माहित आहे की, जेव्हा ते विराट कोहलीच्या विरुद्ध काही बोलतात, तेव्हा त्यांचं नाव वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर दिसेल. चाहत्यांनी या वक्तव्याला अमित मिश्राशी जोडलं आहे. शमीचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.
संबंधित बातम्या:
रंगेहाथ पकडलं अन्...; हार्दिक पांड्याच्या चुकीची शिक्षा नताशा भोगतेय?, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशाची पहिली पोस्ट; भारताबाहेर गेल्यावर काय करतेय?