Mohammed Shami Ranji Trophy Bengal 19-member squad : 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा मोहम्मद शमी सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. कारण या स्पर्धेनंतर शमीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र या मालिकेपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकला नाही. आता तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. मात्र, याआधी बंगालच्या रणजी संघातून शमी बाहेर जाणार असल्याचा दावा काही अहवालात करण्यात आला आहे.


शमी रणजी ट्रॉफीतून होणार बाहेर?


राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सध्या शमीचे पुनर्वसन सुरू आहे. रणजी ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात तो बंगालसाठी खेळून भारतीय संघात आपले स्थान निश्चित करेल, असा विश्वास होता. पण रेव्ह स्पोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, पहिल्या दोन रणजी सामन्यांसाठी बंगाल क्रिकेट संघात शमीच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. 


बंगाल 11 ऑक्टोबरपासून रणजी ट्रॉफीमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल, जिथे त्याचा सामना उत्तर प्रदेशशी होईल. शमीने भारतीय संघात येण्यापूर्वी दोन देशांतर्गत सामने खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. बंगालकडून आकाशदीप आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार रणजी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मात्र सध्या शमी बंगालकडून खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.


टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना बीसीसीआयच्या एका सूत्राने शमीच्या पुनरागमनाबद्दल सांगितले. सूत्रानुसार शमी न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुनरागमन करू शकतो. मोहम्मद शमीचे पुनर्वसन मोठ्या प्रमाणावर योग्य दिशेने सुरू आहे. तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.


16 ऑक्टोबरपासून रंगणार थरार  


भारतीय संघ 16 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. सध्या भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. दुसरा सामना 24 ऑक्टोबरपासून तर शेवटचा सामना 1 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेत सहभागी होणार आहे.


 हे ही वाचा - 


Irani Cup 2024 : ऋतुराज गायकवाडचं 'बॅड लक'; अजिंक्य रहाणेने संपवला दुष्काळ, 27 वर्षांनंतर इराणी ट्रॉफीवर मुंबईचा कब्जा


'हा केवळ शो ऑफ..' क्रिकेटर मोहम्मद शमीच्या मुलीसोबतच्या खरेदीवर त्याच्या पूर्वपत्नीचे गंभीर आरोप, म्हणाली..


Women's T20 World Cup scenario : टीम इंडियाचं गणित बिघडलं; सेमीफायनल खेळण्यासाठी जिंकावे लागणार इतके सामने? जाणून घ्या समीकरण