लंडन : इंग्लंडमधील विश्वचषकाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला आहे. विश्वचषकाच्या या रणांगणात प्रत्येक सामन्यागणिक अनेक विक्रमांची रास रचली जात आहे. भारत आणि अफगाणिस्तान संघांमधील सामन्यात अशाच एका विक्रमाची नोंद झाली आहे.


साऊदम्पटनच्या रोज बाऊल स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या त्या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं हॅटट्रिकची नोंद करत विश्वचषकात एक नवा विक्रम प्रस्थापित केला. विश्वचषकात हॅटट्रिक घेणारा शमी हा भारताचा दुसरा तर जगातला केवळ दहावा गोलंदाज ठरला. शमीनं अखेरच्या षटकात अगदी मोक्याच्या क्षणी अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबी, आफताब आलम आणि मुजीब उर रेहमानला माघारी धाडत टीम इंडियाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.


शमीच्या याच विक्रमी कामगिरीच्या पार्श्वभूमीवर नजर टाकूया विश्वचषकातल्या आजवरच्या हॅटट्रिकवीरांवर...


चेतन शर्मा (भारत, 1987)


भारताच्या चेतन शर्मानं विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदा हॅटट्रिक करण्याचा मान मिळवला. 1987 साली चौथ्या विश्वचषक स्पर्धेत चेतन शर्मानं नागपूरमध्ये झालेल्या साखळी फेरीत न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात ही कामगिरी बजावली. न्यूझीलंडच्या केन रुदरफोर्ड, ईयान स्मिथ आणि ईवान चॅटफिल्ड या फलंदाजांना माघारी धाडत चेतन शर्मानं विश्वचषकातली पहिलीवहिली हॅटट्रिक साजरी केली.


सकलेन मुश्ताक (पाकिस्तान, 1999)


पाकिस्तानचा माजी ऑफ स्पिनर सकलेन मुश्ताक विश्वचषकात हॅटट्रिक नोंदवणारा दुसरा गोलंदाज ठरला. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या 1999 च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध सकलेननं हॅटट्रिकची नोंद केली. 272 धावांचा पाठलाग करताना झिम्बाव्वेची सात बाद 123 अशी अवस्था झाली होती. त्याचवेळी सकलेननं हेन्री ओलोन्गा, अडम हकल आणि पोमी बांग्वाला लागोपाठच्या चेंडूवर माघारी धाडत झिम्बाब्वेचा डाव संपुष्टात आणला.


चामिंडा वास (श्रीलंका, 2003)


2003 सालच्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेच्या चमिंडा वासनं सामन्याच्या पहिल्याच तीन चेंडूवर बांगलादेशच्या तीन फलंदाजांना माघारी धाडून वन डे क्रिकेटच्या इतिसाहात नवा इतिहास घडवला. विश्वचषकातली ही तिसरी हॅटट्रिक होती. पण वन डे क्रिकेटमध्ये सामन्याच्या पहिल्या तीन चेडूवर हॅटट्रिक घेणारा चमिंड वास हा एकमेव गोलंदाज ठरला. त्यानं बांगलादेशच्या हनन सरकार, मोहम्मद अश्रफुल आणि एहसानुल हकला तंबूचा रस्ता दाखवला.


ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया, 2003)


2003 च्या दक्षिण आफ्रिकेतल्या विश्वचषकात गोलंदाजांचा चांगलाच बोलबाला राहिला. चमिंडा वासच्या हॅटट्रिकनंतर अकरा दिवसांनी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीनं त्या विश्वचषकातली दुसरी हॅटट्रिक नोंदवली. केनियाविरुदधच्या सामन्यात ब्रेट लीनं चौथ्याच षटकात केनियाच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यात केनेडी ओटिनो, ब्रिजल पटेल आणि डेव्हिड ओबुया यांचा समावेश होता.


लसिथ मलिंगा (श्रीलंका, 2007 आणि 2011)


2007 साली लसिथ मलिंगा नावाचं वादळ विश्वचषकात घोंगावलं आणि अजूनही हे वादळ क्रिकेटविश्वात धुमाकूळ घालत आहे. लसिथ मलिंगा हा विश्वचषक क्रिकेटच्या इतिहासात दोन वेळा हॅटट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज आहे. 2007 साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्वचशकात मलिंगानं दक्षिण आफ्रिकेच्या शॉन पोलॉक, अँड्रयू हॉल आणि जॅक कॅलिसला माघारी धाडत दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडवली होती. त्यानं हॅटट्रिक साजरी केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर मखाया एनटीनीला माघारी धाडत चार चेंडूत सलग चार विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला होता.


2011 साली मलिंगानं केनियाविरुद्ध याच इतिहासाची पुनरावृत्ती केली. केनियाचे तन्मय मिश्रा, पीटर ओनगोन्डो आणि शीम एनगोचो हे मलिंगाच्या भेदक माऱ्याचे शिकार ठरले.


केमार रोच (वेस्ट इंडिज, 2011)


2011 सालच्या विश्वचषकातली दुसरी हॅटट्रिक नोंदवली ती वेस्ट इंडिजच्या केमार रोचनं. दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाकडून हॅटट्रिक घेणारा रोच हा पहिलाच गोलंदाज ठरला. विश्वचषकाच्या साखळी सामन्यात रोचनं नेदरलॅन्डच्या पीटर सीलर, बर्नार्ड लूट्स, बेरन्ड वेस्टडिक यांना माघारी धाडत विक्रमी हॅटट्रिक नोंदवली.


स्टीव्हन फिन (इंग्लंड, 2015)


इंग्लंडच्या स्टीव्हन फिननं विश्वचषक इतिसाहातली आठवी हॅटट्रिक नोंदवली. 2015 च्या विश्वचषकात फिननं ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी बजावली. त्या सामन्यात फिननं ब्रॅड हॅडिन, ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल जॉन्सनला माघारी धाडून हॅटट्रिक साजरी केली.


जीन पॉल ड्युमिनी (दक्षिण आफ्रिका, 2015)


दक्षिण आफ्रिकेच्या जीन पॉल ड्युमिनीनं 2015 च्या विश्वचषक स्पर्धेतली दुसरी हॅटट्रिक नोंदवली. त्यानं श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूज, नुवान कुलशेखरा आणि थरिंदू कौशलला लागोपाठच्या चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला.