जर बॅटर्सनी क्रीज सोडणं बंद केलं नाही, तर बॉलर्सचीही चूक नाही; नॉन-स्ट्रायकर रन आउटवर MCC चा थेट इशारा
Non Striker Run Out: जर बॅटर्सनी क्रीज सोडणं बंद केलं नाही, तर आऊट केल्यास बॉलर्सचीही चूक नसेल, नॉन-स्ट्रायकर रन आउटवर MCC चा थेट इशारा

Non Striker Run Out: मॅरीलेबोन क्रिकेट क्लब, ज्याने क्रिकेटच्या मैदानावरील नियम जोडले आणि बदलले, त्याने नॉन-स्ट्रायकरच्या एंडवर क्रीझ सोडून जाणाऱ्या फलंदाजांना धावबाद करणं हा कायदेशीर नियम बनवला आहे. परंतु असं असूनही, मंकडिंग नियमाबाबत सातत्यानं चर्चा होत आहे. तसेच, या नियमावरुन अनेकदा आरोप-प्रत्यारोपांचं सत्र रंगल्याचं पाहायला मिळतं. तसेच, मंकडिंगचा नियम खेळाच्या भावनेच्या विरुद्ध आहे की, खेळाच्या भावनेशी संबंधित आहे याबाबतही वादविवाद चालू आहेत.
MCC कडून मंकडिंगबाबत भूमिका स्पष्ट
आता एमसीसीनं मंकडिंगबाबत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. खेळाच्या मैदानावरील हा नियम केवळ न्याय्यच नाही तर अत्यंत महत्त्वाचा असल्याचंही MCC नं म्हटलं आहे. अशा परिस्थितीत फलंदाजानं स्ट्राईक सोडून पुढे जाणं थांबवलं नाही, तर गोलंदाजानं त्याला आऊट करणं पूर्णपणे योग्य असल्याचंही MCC नं म्हटलं आहे.
23 फेब्रुवारी रोजी MCC जागतिक क्रिकेट समितीचे अध्यक्ष माईक गॅटिंग यांनी यासंदर्भात भाष्य केलं. ते म्हणाले की, "आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे की, जर एखाद्या फलंदाजाला अशा प्रकारे आऊट द्यायचं नसेल तर त्यानं अशा प्रकारे धावाही चोरू नयेत. तसेच, याबाबत कोणत्याही इशाऱ्याची अपेक्षा फलंदाजानं ठेवू नये. चेंडू टाकल्यानंतरच नॉन स्ट्रायकरनं क्रीज सोडला, तर मंकडिंग नियमानुसार बाद करण्याची गरजच भासणार नाही."
नॉन स्ट्रायकरला बाद करून, गोलंदाज खलनायक ठरत नाही
समिती सदस्य कुमार संगकारानं मंकडिंग संदर्भात गोलंदाजांना पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, "मंकडिंग नियमानुसार, फलंदाजाला बाद केलं तर गोलंदाज विलन ठरत नाही. प्रत्येक फलंदाजाला मैदानावर आपल्या क्रीजमध्ये राहण्याचा किंवा धावा चोरण्याचा प्रयत्न करताना विकेट गमावण्याचा धोका असतो, जर त्यानं चोरी केली तर तो नियम मोडतोय, गोलंदाजाची यात चूक नाही."
महत्त्वाची बाब म्हणजे, दुबईतील आयसीसी मुख्यालयात झालेल्या बैठकीत एमसीसीनं हे सांगितलं आणि नियमांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यादरम्यान अनेक गोष्टींवर चर्चा झाली, पण त्यापैकी नॉन-स्ट्रायकर रन आउट योग्य की, अयोग्य? या मुद्द्यानं सर्वांचं लक्ष वेधलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
