Manoj Tiwary Team India : भारतीय संघाचा खेळाडू मनोज तिवारी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत मनोज तिवरी याने निवृत्तीची घोषणा केली. मनोज तिवारी याने टीम इंडियासाठी 12 वनडे, 3 टी 20 सामने खेळले आहेत. मनोज तिवारीने भारतीय संघासाठी अखेरचा सामना 2015 मध्ये खेळला आहे. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये मनोज तिवारी पश्चिम बंगाल संघाकडून खेळत होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मनोज तिवारी याचा दमदार रेकॉर्ड आहे. मनोज तिवारी याने पश्चिम बंगालच्या राजकारणात पाऊल टाकले होते. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात क्रीडा मंत्री म्हणून काम करतोय. आज सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली.
मनोज तिवारीने इन्स्टाग्रामवर टीम इंडियाच्या जर्सीमधील फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबत निवृत्तीबाबतची पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, "क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. क्रिकेटने मला खूप काही दिलेय. मी जी काही स्वप्ने पाहिली होती, ती क्रिकेटमुळेच पूर्ण झाली आहेत. लहानपासून मला प्रशिक्षण देणाऱ्या सर्व प्रशिक्षकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या सर्व यशामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. माझ्या क्रिकेटच्या प्रवासात माझे प्रशिक्षक मनबेंद्र घोष एक स्तंभ म्हणून माझ्यासोबत उभे राहिले. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मला मार्गदर्शन केले. माझे आई-वडिलांचेही आभार... आई-वडिलांनी माझ्यावर कधीच शिक्षण अथवा इतर कोणत्याही गोष्टीचा दबाव दिला नाही. माझ्या पत्नीचेही खूप आभार.. प्रत्येक परिस्थितीमध्ये ती माझ्यासोबत उभी राहिली. "
मनोज तिवारी याचं आतंरराष्ट्रीय करिअर छोटेच राहिले. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने छाप सोडली. मनोज तिवारी याने भारतासाठी 12 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 12 सामन्यात त्याने 287 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्यशिवाय तीन टी 20 सामन्यातही मनोज तिवारी याने भारताचे प्रतिनिधित्व केलेय. तीन 20मधील एका डावात मनोज तिवारी याने 15 धावांची खेळी केली. मनोज तिवारी याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप सोडली आहे. 141 फर्स्ट क्लास सामन्यात त्याने 9902 धावा केल्या आहेत. यामध्ये एका त्रिशतकाचाही समावेश आहे. सर्वोच्च धावसंख्या 303 इतकी आहे. 141 फर्स्ट क्लास सामन्यात मनोज तिवारी याने 29 शतके आणि 45 अर्धशतके ठोकली आहेत. लिस्ट ए च्या 169 सामन्यात 5581 धावा केल्या आहे. यामध्ये सहा शतके आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे. मनोज तिवारीने आयपीएलमध्येही दमदार कामगिरी केली आहे. मनोज तिवारी याने 98 आयपीएल सामन्यात 1695 धावा केल्या आहेत. यामध्ये सात अर्धशतकांचा समावेश आहे. मनोज तिवारी याने भारतासाठी अखेरचा वनडे सामना 2015 मध्ये झिम्बॉब्वेविरोधात खेळला. तर सप्टेंबर 2012 मध्ये त्याने न्यूझीलंडविरोधात अखेरचा टी20 सामना खेळला आहे.