IND vs WI, Sarfaraz Khan : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची नुकतीच निवड झाली. बीसीसीआयने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली. यामध्ये ऋतुराज गायकवाड, यशस्वी जायस्वाल, मुकेश कुमार यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढणाऱ्या सर्फराजला टीम इंडियात स्थान मिळाले नाही. यावरुन सोशल मीडियावर बीसीसीआयवर टीका केली जात आहे. सर्फराजला स्थान न दिल्यामुळे माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान समालोचक आकाश चोप्रा यांनीही बीसीसीवर नाराजी व्यक्त केली आहे. सर्फराजला वारंवार इग्नोर का केले जातेय? याबाबत क्रीडाप्रेमींना बीसीसीआयने सांगायला पाहिजे, असे आकाश चोप्रा म्हणालेत. आकाश चोप्रा यांनी आपल्या युट्यूब चॅनलवरुन बीसीसीआयला खडे बोल सुनावले आहेत.


भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी सर्फराजला काय करावे लागेल ? देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील तीन वर्षांपासून तो खोऱ्याने धावा करतोय.. तरीही त्याला संधी मिळत नाही.. त्याला वारंवार इग्नोर का केले जातेय ? असा सवाल चोप्रा यांनी केला आहे. 


सर्फराजला संघात स्थान का दिले नाही? याचे कारण बीसीसीआयने द्यायला हवे. सर्फराजची कोणती बाब आवडत नाही, त्यामुळे स्थान दिले नाही. सर्फराजबाबात अद्याप विचार का केला जात नाही.. हे स्पष्ट करायला हवे. तुम्ही फर्स्ट क्लास क्रिकेटमधील धावांना किंमत दिली जात नाही का ? असा प्रश्न आकाश चोप्रा यांनी उपस्थित केला. 


सर्फराजची आतापर्यंतची कामगिरी ?


देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराज खान मुंबईच्या संघाकडून खेळतो. त्याने आतापर्यंत 37 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. यामधील 54 डावात फलंदाजी करताना 79.65 च्या सरासरीने 3505 धावांचा पाऊस पाडलाय. यादरम्यान त्याने 13 शतके आणि 9 अर्धशतके झळकावली आहेत. सर्वोच्च धावसंक्या नाबाद 301 इतकी आहे.  


यशस्वी, ऋतुराजला कसोटीत स्थान -


वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) वनडे आणि कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयनं शुक्रवारी (23 जून) टीम इंडियाची घोषणा केली. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माच संघाचं नेतृत्व करेल. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला मात्र कसोटी संघातून वगळण्यात आलं आहे. तर अजिंक्य रहाणेला बढती देण्यात आली असून त्याच्याकडे कसोटी मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना प्रथमच कसोटी संघात स्थान मिळालं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी यशस्वी जैस्वालला स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आलं होतं. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांचाही कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद शमीला वनडे आणि कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. उमरान मलिक आणि संजू सॅमसन यांचंही वनडे संघात पुनरागमन झालं आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड, वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमार यांचीही वनडे संघात निवड झाली आहे.