Yashasvi Jaiswal Journey : यशस्वी जायस्वालने (Yashavi Jaiswal) नुकतंच वेस्ट इंडिज विरोधात कसोटी (India vs West Indies) सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच कसोटीत त्याने शतक ठोकून त्याने आपल्या नावावर विक्रमाची नोंद केली. दुसऱ्या कसोटीतही त्याने अर्धशतकी खेळी रचली. या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत यशस्वी जायस्वालने 88.67 च्या सरासरीने 266 धावा केल्या. आयपीएल 2023 मध्ये त्याने चांगली कामगिरी केली. त्याआधीच्या आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली होती.
आयपीएल आणि भारतीय संघापर्यंतचा त्याचा प्रवास अतिशय संघर्षाचा होता. सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो देखील व्हायरल झाले होते, ज्यात तो आपल्या वडिलांसह पाणीपुरी विकताना दिसत होता. यशस्वीने कॅन्टिन आणि डेअरमध्येही काम केलं होतं. परंतु याबाबत आता एक मोठी बाब समोर आली आहे. यशस्वीने सुख आणि सुविधांसह इथपर्यंतचा प्रवास केल्याचा दावा यशस्वीचे प्रशिक्षक ज्वाला सिंह यांनी केला आहे. शिवाय त्याने कधीही पाणीपुरी विकली नाही, असं त्यांनी म्हटलं
जायस्वालबाबत धक्कादायक खुलासा
क्रिककॅक या वेबसाईटशी बोलताना प्रशिक्षक ज्वाला सिंह यांनी सांगितलं की, "लोक म्हणतात की यशस्वी जायस्वाल केवळ पाणीपुरी विकत होता आणि संघर्ष करत इथे पोहोचला. यात काहीसं तथ्य नक्की आहे. त्याने आयुष्यात कधी पाणीपुरी विकली नाही. 2013 मध्ये त्याने माझ्यासोबत क्रिकेट ट्रेनिंग सुरु केलं परंतु त्याने कधी पाणीपुरी विकलेली नाही. ही गोष्ट वारंवार शेअर केली जाते आणि त्यामुळे हेडलाईन बनते. पण यात केवळ पाच टक्केच तथ्य असावं. पण जायस्वालचं पाणीपुरीचं दुकान होतं किंवा त्याला एवढा संघर्ष करावा लागला, हे खरं नाही. या गोष्टीचं जायस्वाल आणि मला फारच वाईट वाटतंय की मीडिया असं सांगते की जायस्वाल फक्त पाणीपुरी विकायचा.
प्रशिक्षक ज्वाला सिंह सांगितलं की, यशस्वी जायस्वाल जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आला तेव्हा तो तंबूत राहायता. तेव्हा त्याने हे काम केलं असावं. त्याच्याकडे मूलभूत गोष्टी देखील नव्हत्या. वीज नव्हती, जेवण व्यवस्थित मिळत नव्हतं. पावसात त्याच्या तंबूत पाणी शिरायचं. पण जेव्हा त्याने माझ्यासोबत ट्रेनिंग सुरु केल तेव्हा त्याच्या या अडचणी कमी झाल्या. मी त्याला दहा वर्षांपासून ओळखतो. त्यामुळे 2013 पासून 2021 पर्यंत मुंबईत त्यांच्या घरात राहण्याची सोय केली होती. एका चांगल्या कुटुंबातील मुलांना मिळणाऱ्या सर्व सुख सोयी यशस्वी जायस्वालला मिळल्या.
'मीडियाने चुकीच्या पद्धतीने बातम्या दाखवल्या'
"2018 मध्ये एक टीव्ही शो होता, त्यासाठी ते माझ्याकडे आणि यशस्वीकडे आले आणि म्हणाले की, पाणीपुरीच्या स्टॉलमध्ये एक-दोन फोटो व्हिडीओ घ्यायचे आहेत. तेव्हा यशस्वीने माझ्या अकॅडमीच्या काही मुलांना पाणीपुरी खाऊ घालताना फोटो काढले, तेव्हा मला किंवा जायस्वालला काहीच माहित नव्हतं. यानंतर मीडियाने ही गोष्ट चुकीच्या पद्धतीने व्हायरल केली की, जायस्वाल केवळ पाणीपुरीच विकत होता आणि संघर्ष करुन क्रिकेटर बनला. याचं यशस्वी आणि त्याच्या कुटुंबियांनाही वाईट वाटतं की मीडियाने हे चुकीच्या पद्धतीने सांगितलं," असं ज्वाला सिंह यांनी म्हटलं.
ते पुढे म्हणाले की, "एखादा खेळाडू चांगला खेळला तर त्याच्या संघर्षाची कहाणी दाखवायची हा सध्याचा ट्रेण्ड बनला आहे. हो, त्याने अनेक अडचणींचा सामना केला आहे, पण त्याने वडिलांसह मुंबईत पाणीपुरी विकली हे खरं नाही. तो जेवढं चागलं खेळतोय ते त्यामागे त्याची मेहनत, प्रशिक्षण, जेवण याचा हात आहे. मी त्याच्यासाठी जे काही करता येईल तेवढं केलं आहे. पैसा आणि वेळ दिल्याशिवाय कोणीही व्यक्ती क्रिकेटर बनू शकत नाही. मी त्याच्यासाठी माझ्या आयुष्याची नऊ ते दहा वर्षे दिली आहेत."
हेही वाचा