IND Vs WI, 1st T20 : पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने पाच धावांनी विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 9 विकेटच्या मोबल्यात 145 धावाच करता आल्या. भारताकडून तिलक वर्मा याने सर्वाधिक 39 धावांची खेळी केली. पाच सामन्याच्या टी 20 मालिकेत वेस्ट इंडिजने 1-0 ने आघाडी घेतली.
वेस्ट इंडिजने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. आघाडीच्या फलंदाजंनी निराशाजनक कामगिरी केली. ईशान किशन आणि शुभमन गिल यांना मोठी खेळी करता आली नाही. दोन्ही सलामी फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. ईशान किशन अवघ्या सहा धावांवर तंबूत परतला. तर शुभमन गिल अवघ्या तीन धावा काढून बाद झाला. ईशान किशन याने 9 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने सहा धावा केल्या. 28 धावांत भारताने दोन विकेट गमावल्या होत्या.
सलामी फलंदाज माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी मोर्चा सांभाळला. अनुभवी सूर्याने चांगली सुरुवात केली, पण तो 21 धावांवर तंबूत परतला. सूर्यकुमार यादवने 21 चेंडूत एक षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 21 धावांचे योगदान दिले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 39 धावांची भागिदारी केली. सूर्यकुमार माघारी परतल्यानंतर तिलक वर्माही फार काळ टिकला नाही. संघाच्या 77 धावा झाल्यानंतर तिलक वर्माही बाद झाला. तिलक वर्माने पदार्पणात विस्फोटक फलंदाजी केली. तिलक वर्माने 22 चेंडूत 39 धावांची खेळी केली. तिलक वर्माने तीन खणखणीत षटकार ठोकले. त्याशिवाय दोन चौकार मारले.
आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने संजू सॅमसन याला हाताशी धरत भारताची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण अनुभवी जेसन होल्डरने हार्दिक पांड्याला त्रिफाळाचीत करत ही जोडी फोडली. हार्दिक पांड्याने 19 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 19 धावांचे योगदान दिले. हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन यांनी 26 चेंडूत 36 धावांची भागिदारी केली. हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर संजू सॅमसन यानेही लगेच विकेट फेकली. संजू सॅमसन 12 धावांवर धावबाद झाला. 113 धावांत भारतीय संघाने सहा विकेट गमावल्या. अखेरीस अक्षर पटेल याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण 13 धावांवर अक्षर पटेल झेलबाद झाला. अक्षर पटेल याने 11 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 13 धावा केल्या.
अक्षर पटेल बाद झाल्यानंतर अर्शदीप सिंह याने लागोपाठ दोन चौकार मारत सामन्यात रंगत आणली. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी सहा चेंडूत 10 धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवर कुलदीप यादव बाद झाला. कुलदीपला फक्त तीन धावा करता आल्या. त्यानंतर चहल याने एक धाव घेत अर्शदीपला स्ट्राईक दिली. तिसऱ्या चेंडूवर अर्शदीप याने दोन धावा घेतल्या. शेफर्ड याने चौथा चेंडू निर्धाव टाकला. दोन चेंडूत सात धावा करायच्या होत्या. पाचव्या चेंडूवर दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात अर्शदीप सिंह धावबाद झाला. अर्शदीप सिंह याने सहा चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 11 धावा केल्या. अखेरच्या चेंडू निर्धाव गेला. वेस्ट इंडिजने हा सामना पाच धावांनी जिंकला. वेस्ट इंडिजकडून अबोद मकॉय, जेसन होल्डर आणि शेफर्ड यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. अकिल हुसेन याने एक विकेट घेतली.
पॉवेलची कर्णधारपदाला साजेशी खेळी, विडिंजची 149 धावांपर्यंत मजल
वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमॉन पॉवेल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ब्रेंडन किंग आणि काइल मायर्स यांनी संयमी सुरुवात केली. पण चौथ्या षटकात चहल याने लागोपाठ दोन विकेट घेत विडिंजला बॅकफूटवर ढकलले. यानंतर फलंदाजीला आलेल्या निकोलस पूरनने येताच आपले इरादे स्पष्ट केले आणि पहिल्या 6 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 विकेट गमावून 54 धावांपर्यंत मजल मारली. 58 धावांवर विंडीज संघाला जॉन्सन चार्ल्सच्या रुपाने तिसरा धक्का बसला, तो अवघ्या 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार रोव्हमन पॉवेलने निकोलस पूरनला साथ दिली आणि धावसंख्या वेगाने वाढवत राहिली. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 38 धावांची भागीदारी पाहायला मिळाली.
या सामन्यात निकोलस पूरन 34 चेंडूत 41 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रोव्हमन पॉवेलने शिमरॉन हेटमायरसोबत 5व्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी केली. जिथे पॉवेल 48 धावांची इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी अखेरच्या षटकात माघारी परतताना भारतीय गोलंदाजांनी विंडीजच्या फलंदाजांना वेगवान धावसंख्या होऊ दिली नाही. 20 षटकांनंतर वेस्ट इंडिजचा संघ 6 गडी गमावून 149 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताच्या गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहलने 2-2, तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी 1-1 विकेट घेतली.