Kuldeep Yadav & Ravi Ashwin Viral Video : कुलदीप यादव आणि रवीचंद्रन अश्विन या फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 218 धावांत गुंडाळून पाचव्या कसोटी सामन्यावर भारताला वरचष्मा मिळवून दिला आहे. या कसोटीत पहिल्या दिवसअखेर भारतानं एक बाद 135 धावांची मजल मारली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, त्यावेळी रोहित शर्मा 52 आणि शुभमन गिल 26 धावांवर खेळत होता. यशस्वी जैस्वालनं 58 चेंडू्ंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह 57 धावांची खेळी उभारली. त्याआधी इंग्लंडचा पहिला डाव दोन बाद 100 धावांवरून अवघ्या 218 धावांत गडगडला. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवनं 72 धावांत इंग्लंडचा निम्मा संघ गुंडाळला. अनुभवी रवीचंद्रन अश्विननं 51 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडून त्याला छान साथ दिली. भारताच्या तीन फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडच्या दहा फलंदाजांना तंबूत धाडलं.


कुलदीप यादव भारताकडून सर्वोत्तम गोलंदाज ठरला, त्यान पाच फलंदाजांना तंबूत पाठवलं. 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या अश्विनने चार फलंदाजांची शिकार केली. रवींद्र जाडेजानं एक विकेट घेतली. इंग्लंडचा डाव 218 धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय गोलंदाजामधील मोठेपणा दिसला. अश्विन आणि कुलदीप यांच्यामध्ये सन्मानाचा शानदार नजारा पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


झालं असं की..... कुलदीप यादव यानं पाच विकेट घेतल्या. त्यामुळे सामन्यानंतर रितीरिवाजाप्रमाणे चेंडू कुलदीप यादवकडे आला. पण अश्विनचा 100 वा कसोटी सामना असल्यामुळे कुलदीप यादवनं चेंडू सन्मानानं अश्विनकडे दिला. पण अश्विन यानं तो तुझा मान आहे. तूच चेंडू घे.. असा मोठेपणा दाखवला. वेगवान गोलंदाजाने यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. सिराजने चेंडू अश्विनला दिला. पण अश्विनने तो चेंडू पुन्हा कुलदीपच्या पुड्यात दिला. भारतीय गोलंदाजांमध्ये एकमेंकाच्या सन्मानासाठी सुरु असलेले हे नाट्य खरचं कौतुकास्पद होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


पाहा व्हिडीओ...







अश्विननं आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात चार विकेट घेतल्या. त्यामुळे सन्मानार्थ कुलदीपनं आपल्याकडील चेंडू अश्विनकडे सोपवला. पण अश्विननं कुलदीपला चेंडू माघार करत तो तुझा मान आहे. माझ्याडे असे बरेचसे चेंडू आहेत. तू तुझा मान घेतला पाहिजे असं म्हणत चेंडू कुलदीपला दिला. अखेर कुलदीप यादवने चेंडू घेत स्टेडियममधील उपस्थित चाहत्यांचं अभिवादन स्वीकारलं.
 
अश्विनचं शानदार करियर -



आर. अश्विन यानं कसोटी क्रिकेटमध्ये नुकत्याच 500 विकेटचा टप्पा पार केला. भारतासाठी 500 विकेट घेणारा अश्विन दुसरा गोलंदाज ठरलाय. याआधी अनिल कुंबळेनं असा पराक्रम केलाय. आर. अश्विन यानं आतापर्यंत 511 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय त्यानं पाच शतकेही ठोकली आहेत.