IND vs ENG : भारत विरूद्ध इंग्लंडच्या सामन्याचा आज दुसरा दिवस. पहिल्या दिवशी भारताने (Team India) वर्चस्व गाजवलं. आधी गोलंदाजांनी भेदक मारा केला, त्यानंतर फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. पहिल्या दिवसअखेर कसोटी सामन्यात भारतानं (IND vs ENG) एक बाद 135 धावांची मजल मारली. कुलदीप यादव (kuldeep yadav) आणि रवीचंद्रन अश्विन (ravi ashwin) या फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 218 धावांत गुंडाळला. इंग्लंडनं शानदार सुरुवात केली होती, पण कुलदीप यादव आणि आर. अश्विन यांनी फक्त 9 धावांत सामना फिरवला.
बेन स्टोक्स यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या फलंदाजांनी शानदार सुरुवात केली. जॉनी बेयरस्टोला बाद झाल्यानंतर इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी सुरुवातीला इंग्लंडच्या फलंदाजांना अनेकदा अडचणीत टाकले. त्यानंतर फिरकीपुढे साहेबांनी शरणागती पत्कारली.
कुलदीप -अश्विनने डाव पलटला -
प्रथम फलंदाजी कऱणाऱ्या इंग्लंडची सुरुवात शानदार झाली होती. इंग्लंडकडून छोट्या भागिदारी होत होत्या. एकवेळ इंग्लंड 3 बाद 175 अशा सुस्थितीत होता. इंग्लंडचा संघ 400 धावांपर्यंत मजल मारेलच, असं वाटत होतं. पण 44 व्या षटकात कुलदीप यादव यानं जॉनी बेयरस्टो याला तंबूत धाडलं अन् इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली. 3 बाद 175 वरुन इंग्लंडची स्थिती 6 बाद 175 धावा अशी झाली. कुलदीप यादवने बेन स्टोक्सला बाद करत 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला.
दुसरीकडे 50 व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या आर. अश्विन यानं 2 विकेट घेत इंग्लंडची अवस्था आणखी दैयनीय केली. फक्त 9 धावांच्या आत इंग्लंडचे पाच फलंदाज तंबूत परतले. अश्विन यानं त्यानंतर तळाच्या आणखी दोन फलंदाजांची शिकार केली. कुलदीप यादव यानं पाच तर अश्विन यानं चार विकेट घेतल्या. कुलदीप यादव यानं 12 व्या सामन्यात 50 विकेटचा टप्पा पार केला. कुलदीप यादवने इंग्लंडविरोधात चार कसोटी सामन्यात 17 विकेट घेतल्यात.
फिरकीच्या जाळ्यात इंग्लंड अडकला, पहिल्या दिवसावर भारताचा वरचष्मा
कुलदीप यादव आणि रवीचंद्रन अश्विन या फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 218 धावांत गुंडाळून पाचव्या कसोटी सामन्यावर भारताला वरचष्मा मिळवून दिला आहे. या कसोटीत पहिल्या दिवसअखेर भारतानं एक बाद 135 धावांची मजल मारली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, त्यावेळी रोहित शर्मा 52 आणि शुभमन गिल 26 धावांवर खेळत होता. यशस्वी जैस्वालनं 58 चेंडू्ंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह 57 धावांची खेळी उभारली. त्याआधी इंग्लंडचा पहिला डाव दोन बाद 100 धावांवरून अवघ्या 218 धावांत गडगडला. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवनं 72 धावांत इंग्लंडचा निम्मा संघ गुंडाळला. अनुभवी रवीचंद्रन अश्विननं 51 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडून त्याला छान साथ दिली.