IND vs NZ : भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. या दोघांमध्ये आधी तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील. उद्या अर्थात 18 जानेवारीपासून सामने सुरू होतील. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. न्यूझीलंड हा सध्या नंबर वन वनडे संघ आहे, त्यामुळे ही मालिका जिंकणं भारतासाठी सोपं नसेल. तर या सामन्यांपूर्वी आजवरचे दोन्ही संघातील खास एकदिवसीय रेकॉर्ड जाणून घेऊ...

कोणत्याही फलंदाजाच्या सर्वाधिक धावा

या दोघांमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. त्याने 41 सामन्यांच्या 41 डावांमध्ये 46.05 च्या सरासरीने 1750 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 186 धावा आहेत. कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 5 शतकं आणि 8 अर्धशतकं झळकली आहेत.

सर्वाधिक बळी कोणाचे?

भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने या दोघांमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 51 विकेट घेतल्या आहेत. त्याने 30 सामन्यांमध्ये 20.41 च्या सरासरीने या विकेट घेतल्या आहेत.

सर्वाधिक शतकं आणि अर्धशतकं

वीरेंद्र सेहवागने दोन्ही संघांमध्ये सर्वाधिक 6 शतकं झळकावली आहेत. दुसरीकडे सर्वाधिक वेळा 50 चा आकडा पार करण्याच्या बाबतीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 13 वेळा हा आकडा पार केला आहे.

पहिलं शतक

दोन्ही संघांचे वनडे क्रिकेटमधील पहिले शतक ग्लेन टर्नर यांनी 14 जून 1975 रोजी मँचेस्टर येथे झळकावले होते. त्यांनी 117 चेंडूत 114 धावांची नाबाद धावांची खेळी केली होती.

विकेटकीपिंग रेकॉर्ड

या दोन्ही संघाच्या सामन्यांमध्ये भारतीय यष्टिरक्षक नयन मोंगियाने सर्वाधिक 36 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. यामध्ये 24 झेल आणि 12 स्टंपिंगचा समावेश आहे. तर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 33 विकेट्स किंपिंग करताना घेतले आहेत.

फिल्डिंग रेकॉर्ड

न्यूझीलंडचा खेळाडू रॉस टेलरने दोन्ही संघांमधील एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 19 झेल घेतले आहेत. त्याने 35 सामन्यांमध्ये हे झेल घेतले आहेत.

आगामी भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यांचं वेळापत्रक

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 18 जानेवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
दुसरा एकदिवसीय सामना 21 जानेवारी शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर
तिसरा एकदिवसीय सामना 24 जानेवारी  होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर

हे देखील वाचा-