Asia Cup 2023: केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. एनसीएमधील मेडिकल टीमने राहुलच्या फिटनेसचं प्रमाणपत्र दिले आहे. केएल राहुल श्रीलंकेला रवाना होण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याशिवाय विश्वचषकात खेळण्यासाठीही राहुल तयार झाला आहे. आशिया चषकाच्या सुपर ४ सामन्यापासून केएल राहुल उपलब्ध असेल. राहुलच्या समावेशामुळे भारतीय संघाची फलंदाजी अधिकच मजबूत झाल्याचे दिसतेय. पाकिस्तानविरोधात आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर हार्दिक पांड्या आणि इशान किशन यांनी डाव सावरला होता. दोघांनी शतकी भागिदारी करत संघाची धावसंख्या वाढवली होती. त्यामुळे केएल राहुल याला संघात परतण्यासाठी इशान किशन याच्यासोबत स्पर्धा करायची आहे.
केएल राहुल याची आशिया चषकासाठी १७ जणांच्या चमूमध्ये निवड झाली होती. पण दुखापतीमुळे राहुल भारतामध्ये थांबला होता. एनसीएमध्ये त्याने मेहनत घेत दुखापतीवर मात केली आहे. दुखापतीमुळे राहुल आशिया चषकाच्या पहिल्या दोन सामन्याला उपलब्ध नसेल. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्याविरोधात सामन्याला राहुल उपलब्ध नसेल. त्यानंतर पुढील सर्व सामन्यासाठी तो उपलब्ध असेल. नेपाळविरोधात भारताचा सामना चार सप्टेंबर रोजी होणार आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकने अनिवार्य आहे.
पाकिस्तानविरोधातील सामन्यात पावसामुळे रंगाचा बेरंग झाला. पावसाची संततधार पाहता पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. सामना रद्द झाल्यामुळे पाकिस्तानचा संघ सुपर ४ साठी पात्र झाला. भारताकडे फक्त एक गुण आहे. त्यामुळे भारतासाठी डोकेदुखी वाढली आहे. नेपाळ हा नवखा संघ असला तरी क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ आहे. भारतीय संघाला कोणत्याही स्थितीत विजय अनिवार्य आहे.
भारतासाठी आता करो या मरोची लढाई -
पाकिस्तानविरोधातील सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे आता भारतापुढे करो या मरोची स्थिती झाली आहे. सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला नेपाळचा पराभव करणं अनिवार्य आहे. अथवा सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारतीय संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. नेपाळने अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवल्यास भारताचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला विजय अनिवार्य आहे. पाकिस्तानविरोधात नेपाळच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला होता. त्यामुळे नेपाळ संघाला हलक्यात घेण्याची चूक टीम इंडिया करणार नाही. भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये 4 सप्टेंबर रोजी पल्लेकेले स्टेडिअमवर अखेरचा साखळी सामना होणार आहे. यातील विजेता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल.