Ram Siya Ram Song Playing In India vs Pakistan Match : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पल्लेकेले स्टेडियमवरील सामना मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 48.5 षटकात 266 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. पण इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी टीम इंडियाचे कमबॅक केले. भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना स्टेडिअममधील काही दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. भारतीय फलंदाजांनी चौकार आणि षटकार मारल्यानंतर स्टेडिअममध्ये राम सिया राम हे गाण वाजत असल्याचे दिसतेय. या प्रसंगाचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. 


भारतीय टीमने 66 धावासंख्येवर चार विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी शतकी भागिदारी करत डावाला आकार दिला. इशान आणि हार्दिक पांड्या यांनी कमकुवत चेंडूवर चौकार आणि षटकारांची बरसात केली. त्यावेळी  स्टेडियममध्ये आदिपुरुष चित्रपटातील राम सिया राम गाणं वाजत असल्याचे ऐकायला मिळाले. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  तसेच यावर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.







































भारतासाठी आता करो या मरोची लढाई - 


पाकिस्तानविरोधातील सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे आता भारतापुढे करो या मरोची स्थिती झाली आहे. सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला नेपाळचा पराभव करणं अनिवार्य आहे. अथवा सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारतीय संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. नेपाळने अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवल्यास भारताचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला विजय अनिवार्य आहे. पाकिस्तानविरोधात नेपाळच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला होता. त्यामुळे नेपाळ संघाला हलक्यात घेण्याची चूक टीम इंडिया करणार नाही.  भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये 4 सप्टेंबर रोजी पल्लेकेले स्टेडिअमवर अखेरचा साखळी सामना होणार आहे. यातील विजेता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. 


पाकिस्तानच्या तिकडीचा भेदक मारा, इशान-हार्दिकची झुंज - 


पाकिस्तानच्या वेगवान तिकडीसमोर भारतीय फलंदाजांची भंबेरी उडाली. भारतीय संघ संपूर्ण 50 षटके फलंदाजीही करु शकला नाही. शहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह यांनी भारताच्या दहा फलंदाजांना तंबूत धाडले. भारतीय संघाने 48.5 षटकात 266 धावांपर्यंत मजल मारली. इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघ सन्मानजनक धावसंख्यापर्यंत पोहचलाय. इशान किशन याने 82 तर हार्दिक पांड्याने 87 धावांची खेळी केली.  हार्दिक पांड्याने 90 तर इशान किशन याने 81 चेंडूचा सामना केला. हार्दिक आणि इशान यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला 20 धावसंख्या ओलांडता आली नाही. जसप्रीत बुमराह याने टीम इंडियाकडून तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या केली.