Jasprit Bumrah Wins Prestigious Sir Garfield Sobers Award : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वार्षिक पुरस्कारांच्या सर्व विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. क्रिकेट चाहते आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयरची सर्वात जास्त वाट पाहत होते. आयसीसीने आता या पुरस्काराच्या विजेत्याची घोषणाही केली आहे. आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयरसाठी 4 खेळाडूं शर्यतीत होते, ज्यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह इंग्लंडचा फलंदाज जो रूट, हॅरी ब्रूक आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड यांचा समावेश होता. पण यात जसप्रीत बुमराहने बाजी मारली. बुमराहला आयसीसी पुरुष क्रिकेटपटू ऑफ द इयरसाठी प्रतिष्ठित सर गारफिल्ड सोबर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
बुमराह हा भारतासाठी हा पुरस्कार जिंकणारा पाचवा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या आधी राहुल द्रविड (2008), सचिन तेंडुलकर (2010), रविचंद्रन अश्विन (2016) आणि विराट कोहली (2017, 2018) यांनाही आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे. हा पुरस्कार जिंकून बुमराहने हे सिद्ध केले आहे की तो सध्याच्या काळातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज म्हणून का गणला जातो.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की 2024 मध्ये बुमराहने भारतीय संघाला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने स्पर्धेत 4.17 च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने 15 विकेट्स घेतल्या, त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. रेड बॉलच्या क्रिकेटमध्येही बुमराहने त्याच्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला. त्याने 13 सामन्यांमध्ये 71 विकेट्स घेतल्या. 2024 च्या कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो पहिल्या क्रमांकावर होता.
बुमराहने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये 32 विकेट्स घेतल्या, ज्यासाठी त्याला प्लेअर ऑफ द सिरीजचा किताब देण्यात आला. 31 वर्षीय बुमराहने आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूचा पुरस्कारही जिंकला. हे दोन मोठे पुरस्कार जिंकल्यानंतर बुमराहचे मनोबल निश्चितच वाढेल. यामुळे त्यांना भविष्यात आणखी चांगले प्रदर्शन करण्याची प्रेरणा मिळेल.
हे ही वाचा -