IPL Mega Auction 2025: आयपीएलच्या मेगा लिलावात (IPL Mega Auction 2025) चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत सॅम कुरन, रविचंद्रन अश्विन, रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे यांच्यासह अनेक जुन्या खेळाडूंना परत घेतले आहे. परंतु चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहरला पुन्हा संघात घेताना चेन्नई सुपर किंग्सचा डाव फसला. दीपक चहरला मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे. 


आयपीएल 2025 मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी, सर्व 10 संघांनी मिळून 467.95 कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अनेक संघाकडे फारच कमी पैसे शिल्लक राहिले. असे असतानाही दुसऱ्या दिवशी अनेक भारतीय खेळाडूंवर मोठी बोली लावण्यात आली. भुवनेश्वर कुमारला आरसीबीने 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले याशिवाय भारतीय वेगवान गोलंदाजांवरही मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव केला. 


लिलावाच्या दुसऱ्या दिवशी 3 भारतीय खेळाडूंवर पैशांचा पाऊस-


1. दीपक चहर – 9.25 कोटी (मुंबई इंडियन्स)


वेगवान गोलंदाज दीपक चहर 2018 पासून चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत होता. त्याला मुंबई इंडियन्सने मेगा लिलावात 9.25 कोटींची बोली लावून विकत घेतले. मुंबईला यापूर्वी भुवनेश्वर कुमारला खरेदी करता आले नव्हते, परंतु दीपक चहरला त्याच्या जागी विकत घेण्यात यश आले. नवीन चेंडूवर प्रभावी ठरणाऱ्या दीपक चहरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 58 विकेट्स घेतल्या आहेत.


2. मुकेश कुमार – 8 कोटी (दिल्ली कॅपिटल्स)


दिल्ली कॅपिटल्सने मुकेश कुमारला राईट टू मॅच कार्ड वापरून 8 कोटी रुपयांना खरेदी केले. हा करार मुकेशसाठी फायदेशीर ठरला कारण गेल्या हंगामापर्यंत दिल्ली कॅपिटल्स त्याला 5.5 कोटी रुपये देत होती. मुकेश कुमारने आपल्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 20 सामने खेळून 24 विकेट्स घेतल्या आहेत.


3. आकाशदीप - 8 कोटी (लखनौ सुपर जायंट्स)


आकाशदीप 2022 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग आहे, परंतु त्याने यावर्षी भारतासाठी पदार्पण करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. साहजिकच टीम इंडियात आल्यानंतर आणि चांगली कामगिरी केल्यानंतर त्याची ब्रँड व्हॅल्यू प्रचंड वाढली आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्जनेही आकाशदीपवर बोली लावली, पण शेवटी लखनऊ सुपर जायंट्सने त्याला 8 कोटी रुपयांना विकत घेतले.


चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ ( Chennai Super Kings Full Squad)


ऋतुराज गायकवाड, शेख रशीद, आंद्रे सिद्धार्थ, राहुल त्रिपाठी, डेवॉन कॉनवे, एमएस धोनी, वंश बेदी, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, विजय शंकर, दीपक हुड्डा, अंशुल कंबोज, रचिन रविंद्र, जेमी ओव्हरटन , कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, आर अश्विन, सॅम करन, माथिशा पथिराना, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, नाथन एलिस, गुरजपनीत सिंह, नूर अहमद, खलील अहमद.






संबंधित बातमी:


IPL Mega Auction 2025: IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती