Rinku Singh: रिंकू सिंह सुमारे 6 वर्षांपूर्वी शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्समध्ये सामील झाला होता. विशेष म्हणजे 2023 मध्ये गुजरातविरुद्ध सलग पाच षटकार मारून कोलकाताला अतिशय अवघड सामना जिंकून देत तो प्रसिद्धीच्या झोतात आला. यानंतर रिंकू सिंहने केकेआरसाठी अनेक चांगल्या खेळी खेळल्या. त्याचवेळी, गेल्या वर्षी मला टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. मात्र, या वर्षाच्या अखेरीस आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. या मेगा लिलावापूर्वी रिंकू सिंगने मोठे वक्तव्य केले आहे.
कोलकाताने मला रिलीज केल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) खेळणे आवडेल. याचे कारण म्हणजे त्या संघात विराट कोहली आहे, असं विधान रिंकू सिंहने (Rinku Singh) केलं आहे. कोलकाता संघाने 2018 मध्ये रिंकू सिंगला 80 लाख रुपयांना विकत घेतले होते. तेव्हापासून रिंकूला आपल्याकडे कायम ठेवले आहे. त्यानंतर 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये रिंकूची किंमत थोडी कमी झाली. कोलकाताने 55 लाख रुपयांत त्याचा संघात समावेश केला. यंदा त्यांना काही मोजकेच खेळाडू रिटेन करता येणार आहेत. हे लक्षात घेत कोलकाता रिंकूला रिटेन करण्याची शक्यता फार कमी असल्याचे समजते.
रिंकू सिंहची कारकीर्द-
कोलकाता नाईट रायडर्सने रिंकू सिंहला आयपीएल लिलावात 2018 मध्ये विकत घेतले होते. मात्र, या खेळाडूला पहिल्या काही मोसमात खेळण्याच्या फार कमी संधी मिळाल्या. पण रिंकू सिंगने 5 चेंडूत 5 षटकार मारून प्रसिद्धी मिळवली. आज रिंकू सिंगला कोणत्याही ओळखीची गरज नाही. रिंकू सिंहने आतापर्यंत आयपीएलचे 45 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 143.34 च्या स्ट्राइक रेट आणि 30.79 च्या सरासरीने 893 धावा केल्या आहेत. याशिवाय रिंकू सिंगने 2 एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त 23 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
रिंकूची धगधगती कहाणी-
रिंकू सिंह हा उत्तर प्रदेशच्या अलिगढचा. तिथेच त्याचं कुटुंब राहतं. रिंकूचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी झाला. 5 भावंडांमध्ये रिंकू हे तिसरं अपत्य. रिंकूच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे ते गॅस सिलेंडर डिलिव्हरीचं काम करायचे. तिकडे रिंकूला शाळेत असल्यापासूनच क्रिकेटची तुफान आवड होती. ज्यावेळी टीव्हीवर मॅच लागलेली असायची, त्यावेळी रिंकू टीव्हीसमोरुन हटत नव्हता. क्रिकेटवर त्याचं केवळ प्रेम नव्हतं तर क्रिकेट हे त्याचं वेड होतं. शाळेत असल्यापासूनच तो क्रिकेट खेळतो. रिंकूच्या मेहनतीला फळं येण्यास 2014 पासून सुरुवात झाली. त्याला उत्तर प्रदेशकडून लिस्ट ए आणि टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 2016 मध्ये पंजाब विरुद्धच्या सामन्यातून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पाय ठेवले. त्यानंतर रिंकूने मागे वळून पाहिलं नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये रिंकू चमकत राहिला.
संबंधित बातमी:
आता झहीर खान गौतम गंभीरची जागा घेणार?; अहवालातून धक्कादायक खुलासा