IPL 2024, Mumbai Indians : आयपीएलमधली सर्वात मोठी घडामोड म्हणून ज्याकडे पाहिलं जात होतं, त्या करारावर अखेर रविवारी रात्री शिक्कामोर्तब झालं. यानुसार गुजरात टायटन्सला आयपीएलचं जेतेपद मिळवून देणारा कर्णधार हार्दिक पंड्या आता स्वगृही अर्थात मुंबई संघात डेरेदाखल होणार आहे. रविवारी संध्याकाळी यासंदर्भात काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. आधी हार्दिकला गुजरातनं आपल्याकडेच ठेवल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं. मात्र, आता हार्दिक मुंबईकडे परतणार असल्याच्या व्यवहारावर शिक्कामोर्तब झालं आहे. हार्दिक पांड्या, मुंबई आणि गुजरात संघाकडून याबाबत शिक्कामोर्तब झालेय. 19  डिसेंबरला दुबई येथे खेळाडू लिलावप्रक्रिया पार पडणार असून त्यापूर्वी 12  डिसेंबरपर्यंत संघांना खेळाडूंची अदलाबदल करण्याची मुभा आहे. आता हार्दिक मुंबई संघात परतण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व संभाळणार का? या चर्चेने सध्या सोशल मीडियावरील वातावरण तापलं आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे हार्दिक मुंबईचे कर्णधारपद संभाळणार का? ही चर्चा रंगली आहे. याचे उत्तर भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राने अप्रत्यक्षरित्या दिलेय. 


रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरलेय. त्यामुळे रोहित शर्माला कर्णधारपदावरुन बाजूला करण्याची शक्यता कमीच दिसतेय. दुसरीकडे हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातने शानदार कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने पदार्पणात चषक जिंकला, तर दुसऱ्या हंगामात उप विजेतेपद पटकाले होते. आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्सवर वक्तव्य केलेय. आकाश चोप्रा म्हणाला की,  "हार्दिक पांड्या गुजरातचा कर्णधार होता, त्याच्या नेतृत्वात पदार्पणाताच चषक उंचावला होता. दुसऱ्या हंगामात रनरअप राहिला होता. हार्दिक पांड्या कॅश डीलमध्ये (पैशांच्या व्यवहारात) मुंबईच्या ताफ्यात परतलाय, हे थोडं चकीत करणारे आहे. हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार होणार आहे ? मग रोहित शर्माचं काय होणार?"






रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी केली आहे. आयपीएलच्या इतिहासातील मुंबई सर्वात यशस्वी संघ ठरलाय. 2013 ते 2020 पर्यंत रोहितच्या नेतृत्वात पाच चषकावर नाव कोरलेय. अशा स्थितीत यंदा मुंबईचं कर्णधारपद कुणाकडे सोपले जाणार? रोहित शर्मा की हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार होणार ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.



आयपीएलमध्ये हार्दिकचे धमाकेदार करियर - 


हार्दिक पांड्याचे आयपीएलमध्ये शानदार करियर राहिलेय. हार्दिक पांड्याने आतापर्यंत 123 सामने खेळले आहेत. मुंबई आणि गुजरात संघासाठी हार्दिक पांड्या आयपीएलच्या मैदानात उतरला. हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये 145.86 च्या स्ट्राईक रेटने आणि 30.38 च्या स्ट्राईक रेटने 23.09 धावा काढल्या आहेत. गोलंदाजीतही 53 विकेट घेतल्या आहेत.