ICC Cyber Crime : तुम्ही काही दिवसांपूर्वी आलेली जामतारा (Jamtara) वेब सीरिज पाहिलीय का? ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud) आणि हे फ्रॉड करणाऱ्या टोळ्या कशा फसवणूक करतात हे वेब सीरिजमधून दाखवण्यात आलं आहे. आपल्या आजूबाजूलाही अनेक ऑनलाईन फ्रॉड झाल्याच्या घटना आपण ऐकतो, पाहतो. आपल्यापैकी अनेकजण तर स्वतःच या फसवणुकीला बळी पडले असतील. पण तुम्हाला माहितीय का? या जामतारा स्टाईल फ्रॉड्सना तुम्ही आम्हीच नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) देखील बळी पडली आहे. ऑनलाईन ठगांनी आयसीसीला थोडाथोडका नाहीतर तब्बल 25 लाख डॉलर्स म्हणजेच, भारतीय चलनात तब्बल 20 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. 


सायबर फसवणुकीच्या नवनव्या पद्धतींबद्दल आपण नेहमीच ऐकतो. ऑनलाईन ठगांकडून लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याच्या बातम्या येत असतात. मात्र सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) फसवणूक झाल्यामुळे खळबळ माजली आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, सायबर गुन्हेगारांनी जगातील क्रिकेटची सर्वोच्च प्रशासकीय संस्था ICC कडून सुमारे 25 लाख डॉलर्सची (सुमारे 20 कोटी रुपये) फसवणूक केल्याचं बोललं जात आहे. 


ESPNCricinfo ने दिलेल्या माहितीनुसार, "ICC सोबतची ही ऑनलाईन फसवणूक फिशिंगच्या माध्यमातून घडली आहे. ही घटना गेल्या वर्षी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये घडली होती. मात्र, या प्रकरणी आयसीसीने फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) कडे तक्रार केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची एफबीआय चौकशी करत आहे."


ऑनलाईन ठगांनी नेमकी कशी केली फसवणूक? 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, फसवणूक करणाऱ्यांनी ही फसवणूक बिझनेस ई-मेल अॅग्रीमेंट (बीईसी) द्वारे केली होती. याला ई-मेल खाते करार असंही म्हणतात. मात्र, या ऑनलाईन फसवणुकीच्या संपूर्ण पद्धतीचा तपशील मिळू शकला नाही. या प्रकरणी आयसीसीने मात्र बोलणं टाळलं आहे. एफबीआयने याला सर्वात मोठ्या ऑनलाईन गुन्ह्यांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे. BEC घोटाळा हा फिशिंगचा एक प्रकार आहे. यामध्ये कंपन्या आणि व्यक्तींना वायर ट्रान्स्फर करण्यासाठी प्रवृत्त करुन फसवलं जातं. 


एफबीआयकडून तपास सुरु


या प्रकरणात, सायबर गुन्हेगारांनी आयसीसीच्या बँक खात्यातून पैसे हस्तांतरित करण्यासाठी कोणती पद्धत अवलंबली हे अद्याप कळू शकलेलं नाही. दुबईच्या मुख्यालयात हे ठग कोणाच्या संपर्कात होते की, नाही याचा तपास एफबीआयकडून सुरु आहे. हा व्यवहार एकाच वेळी झाला की अनेक वायर ट्रान्सफरने झाला, याचाही तपास सध्या सुरु आहे.


फिशिंगद्वारे ICC ची कोट्यवधींची फसवणूक 


फिशिंगमध्ये सायबर गुन्हेगार एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला लक्ष्य करतात. यानंतर मेल किंवा अन्य लिंकद्वारे त्यांना आपल्या जाळ्यात अडकवतात. लिंकवर क्लिक केल्यावर त्या संस्थेचा किंवा व्यक्तीचा डेटा किंवा यंत्रणा ठगांच्या ताब्यात येते. यानंतर त्यांच्यासोबत फसवणुकीचा खेळ सुरु होतो. फिशिंग ही सर्वात मोठी ऑनलाईन फसवणूक असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.